बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अलीकडेच गाजलेल्या शिवानंद नीलण्णावर यांच्या ‘शिवम असोसिएट्स’ फसवणूक प्रकरणाची शाई अजून वाळलेलीही नसताना, बेळगावमध्ये आणखी एका मोठ्या आणि तितक्याच गंभीर आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. अधिक परताव्याच्या आणि अवाजवी व्याजाच्या आमिषाला बळी पडून सर्वसामान्यांनी गुंतवलेले हजारो कोटी रुपये आता धोक्यात आले असून, ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपावरून ‘आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड’ ही संस्था प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.
नागरिकांमधून आलेल्या तक्रारींची दखल घेत बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवण नायक यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकाने गुरुवारी भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटलच्या मुख्य कार्यालयावर अचानक धाड टाकली. या कारवाई दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त पुरवला होता. अधिकाऱ्यांच्या या पथकाने कार्यालयातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदी जप्त करून त्यांची कसून तपासणी सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील बलराम माने यांच्या मालकीच्या या आदित्यराज कॅपिटल कंपनीवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. कोणतीही वैध कायदेशीर सुरक्षा किंवा परवानगी नसताना, केवळ जादा व्याजाचे अमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करण्यात आल्या आणि ती रक्कम ठेवीदारांच्या संमतीशिवाय इतरत्र गुंतवण्यात आली. या फसवणुकीप्रकरणी संस्थेविरोधात KPID आणि BUDS सेल अंतर्गत आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या महाघोटाळ्याची पाळेमुळे स्थानिक पातळीवर किती खोलवर रुजली आहेत, अशी माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवम असोसिएट्स घोटाळ्यात ज्याप्रमाणे माजी सैनिकांची मोठी पुंजी अडकली होती, तसाच प्रकार येथेही घडला आहे. बेळगाव तालुक्यामधील मोठ्या पतसंस्थेचे बहुतांश सर्वच संचालक या घोटाळ्यात थेट अडकले आहेत. या संचालकांनी स्वतःचे लाखो-कोट्यवधी रुपये या कंपनीत गुंतवले होते आणि केवळ स्वतःपुरतेच मर्यादित न राहता त्यांनी आपल्या पदाचा व प्रभावाचा गैरवापर करून पतसंस्थेचे खातेदार, गुंतवणूकदार आणि ग्रामीण भागातील शेकडो निष्पाप लोकांनाही आदित्यराज कॅपिटलच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त केले. संचालकांच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या कष्टाची कमाई इथे ओतली आणि आता ते पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत.
प्रशासनाने आणि पोलिसांनी गुरुवारी जशी या कार्यालयावर धाड टाकली, तशीच एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली. स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांचे डिजिटल पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आदित्यराज कॅपिटलने आपली अधिकृत वेबसाईट तातडीने बंद केली आहे. कंपनीच्या या संशयास्पद पावित्र्यामुळे गुंतवणूकदारांमधील चिंतेचे आणि घबराटीचे वातावरण कमालीचे वाढले आहे. आज पडलेल्या या अनपेक्षित धाडींनंतर बेळगावातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना प्रवृत्त करणाऱ्या त्या पतसंस्थेच्या संचालकांचे आणि एजंट्सचे धाबे पुरते दणाणले आहेत. उपविभागीय अधिकारी श्रवण नायक आणि पोलीस प्रशासन सध्या या संस्थेचे नेमके आर्थिक व्यवहार काय होते, गोळा केलेला पैसा कुठे वळवण्यात आला, आणि यात आणखी कोणते बडे मासे सामील आहेत, याचा सखोल तपास करत आहेत.
या संपूर्ण महाघोटाळ्यात सर्वात मोठी आणि चिंताजनक बाब म्हणजे त्या येथील त्या नामांकित पतसंस्थेचे समोर आलेले कनेक्शन. आदित्यराज कॅपिटलच्या अवाजवी परताव्याच्या जाळ्यात केवळ या पतसंस्थेचे संचालकच अडकले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि कमिशनसाठी शेकडो सर्वसामान्य खातेदारांनाही या खाईत लोटले आहे. संचालकांनी स्वतः लाखो-कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आणि पतसंस्थेच्या विश्वासावर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या ठेवीही आदित्यराज कॅपिटलकडे वळवण्यास भाग पाडले.
आता हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आणि आदित्यराज कॅपिटलची अधिकृत वेबसाईट अचानक बंद झाल्यानंतर, केवळ कंपनीचे मालकच नाही तर त्या पतसंस्थेचे हे ‘पांढरपेशी’ संचालकही कायद्याच्या कचाट्यात आणि चौकशीच्या तीव्र रडारवर आले आहेत.
पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे येत्या काळात या संचालकांच्या अडचणी तर वाढणारच आहेत; पण ज्या निष्पाप खातेदारांनी पतसंस्थेच्या चेहऱ्यावर आणि शब्दावर विश्वास ठेवून आपले कष्टाचे पैसे गुंतवले, ते सर्वसामान्य खातेदारही आता कायदेशीर आणि आर्थिक कचाट्यात अडकण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. या धक्कादायक उलगड्यामुळे संपूर्ण परिसरासह बेळगावच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.




