बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील ‘यारबल प्रिंट-पॅक’ कंपनीचे संचालक अमेय पाटील यांचा भारतातील प्रिंट आणि पॅकेजिंग क्षेत्रातील टॉप १०० प्रभावशाली नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अमेय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमधील ‘यारबल प्रिंट-पॅक’ कंपनीने केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित न करता विशेष पॅकेजिंग आणि मजबूत व्यावसायिक नियोजनाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या धोरणामुळे कंपनीने २०२५ या आर्थिक वर्षात २० ते २३ टक्के वार्षिक विकासदर नोंदवला असून कंपनीचा एबिटा (EBITDA) २७.५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. कंपनीचा बहुतांश व्यवसाय एफएमसीजी (FMCG) आणि प्रीमियम फूड पॅकेजिंगवर केंद्रित असून एकूण महसुलात याचा वाटा सुमारे तीन चतुर्थांश इतका आहे.
उत्पादनाचा दर्जा आणि अचूकता सुधारण्यासाठी कंपनीने या वर्षात ऑटोमेशन, डाय-कटिंग आणि फोल्डर-ग्लूअर्स यांसारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या कंपनीमध्ये १०० ते १२० कर्मचारी कार्यरत असून उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.

केवळ क्षमता वाढवण्यापेक्षा आवश्यकतेनुसार योग्य उपकरणांची निवड करण्यावर आपला भर असल्याचे अमेय पाटील यांनी सांगितले. व्यावसायिक शिस्त आणि नियोजित उद्दिष्टे नसल्यास कामात अडथळे येतात, त्यामुळे आम्ही बाजारपेठेचा अंदाज घेऊन दीर्घकालीन मूल्य निर्माण करणाऱ्या गोष्टींमध्येच गुंतवणूक करतो, असे मत अमेय पाटील यांनी व्यक्त केले आहे.
या यशाबद्दल त्यांनी ग्राहक, सहकारी आणि कुटुंबीयांचे आभार मानले असून हा गौरव उद्योगातील नाविन्यपूर्ण कामगिरीसाठी अधिक प्रेरित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.




