बेळगाव लाईव्ह : मोबाईल देण्यास नकार दिला म्हणून एका निष्पाप तरुणाची चाकू भोसकून हत्या करणाऱ्या मद्यधुंद महिलेला बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची कडक शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी हा निकाल दिला असल्याची माहिती सरकारी वकील नारायण आर. ई. यांनी दिली.
सदर घटना ३० एप्रिल २०२३ रोजी रात्री कीर्ती हॉटेलसमोरील ढोर गल्ली क्रॉसजवळ घडली होती. मृत नागराज भीमशी रागीपाटील हे आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जयश्री पवन पवार या महिलेने त्यांना अडवून मोबाईलची मागणी केली होती. यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला असता, जयश्रीने रागाच्या भरात स्वतःजवळील चाकू थेट नागराजच्या छातीत भोसकला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी बेळगावच्या मार्केट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक (PI) पॉल प्रियकुमार यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात ठोस पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयाने सर्व साक्षी-पुरावे तपासून आरोपी जयश्री पवार हिला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे स्पष्ट केले. यासोबतच, मृत नागराजच्या वारसांना योग्य ती आर्थिक मदत म्हणजेच नुकसानभरपाई देण्याची शिफारस न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केली आहे. पोलिसांचा अचूक तपास आणि न्यायालयाच्या या गतिमान निकालामुळे पीडित कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे.




