बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या सांबरा विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे उद्घाटन पुढील दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.
बेळगाव विमानतळावर काल मंगळवारी सकाळी ‘यात्रा सुविधा दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना शेट्टर म्हणाले की, नवीन टर्मिनल सुरू झाल्यामुळे हवाई संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
बेळगावला देशातील प्रमुख महानगरांशी जोडणाऱ्या विमान सेवांची संख्या वाढवण्यासाठी आणि अधिक विमान कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात चर्चा झाली असून नवीन टर्मिनल कार्यान्वित होताच सेवांचा विस्तार होईल अशी अपेक्षा आहे.
जागतिक संघर्षांमुळे विमान वाहतूक क्षेत्राला आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचेही नमूद करताना या परिस्थितीचा परिणाम विमान उड्डाणे आणि इंधनाच्या उपलब्धतेवर झाला आहे. तरीही, सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिरावल्यानंतर हे क्षेत्र पुन्हा गती घेईल, असा विश्वास खासदार शेट्टर यांनी व्यक्त केला.

नवीन टर्मिनलमुळे बेळगाव विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता लक्षणीयरीत्या वाढण्याची आणि शहराची सुधारित देशांतर्गत हवाई संपर्काची वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. नव्या टर्मिनल -2 प्रकल्पाची सद्यस्थिती पुढील प्रमाणे आहे.
सुमारे 87 टक्के प्रत्यक्ष काम पूर्ण; जून 2026 अखेरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होण्याची अपेक्षा; अंदाजे खर्च : 223 कोटी रुपये. नवीन टर्मिनलची क्षमता;: एकाच वेळी सुमारे 2,400 प्रवासी (1,200 आगमन आणि 1,200 प्रस्थान). सध्या ॲप्रनचा विस्तार आणि नवीन टॅक्सी-लिंकची कामे एकाच वेळी सुरू आहेत.
विमानांच्या पार्किंग क्षमतेत वाढ : 3 बे (थांबण्याच्या जागा) वरून 12 बे पर्यंत वाढ; एअरबस ए 321 सारख्या मोठ्या विमानांसाठीही उपयुक्त. अतिरिक्त पायाभूत सुविधांची उभारणी : 4 पॅसेंजर बोर्डिंग ब्रिजेस, 14 चेक-इन काउंटर्स, आगमनासाठी 2 कन्व्हेयर बेल्ट्स आणि हाय-मास्ट लाइटिंग यंत्रणा. दरम्यान, बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देणे आणि विमानतळावर स्वतंत्र कार्गो टर्मिनल सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे.




