बेळगाव लाईव्ह :पैगंबर मोहम्मद आणि हजरत आयेशा यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अपमानजनक आणि प्रक्षोभक विधाने करून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या भाजपच्या ‘अल्पसंख्यांक मोर्चा’च्या नेत्या श्रीमती नाझिया इलाही खान, दिव्या सिंग आणि त्यांच्या संपूर्ण पॉडकास्ट टीमविरुद्ध त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेळगावमधील मुस्लिम नागरिकांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि गृहमंत्री प्रियांक एम. खर्गे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या नेतृत्वाखाली बेळगावमधील मुस्लिम जमातींच्या युवा समित्या व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, तसेच मुस्लिम समाज आणि शांतताप्रिय मुस्लिम नागरिकांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे धाडण्याचे आश्वासन दिले. यूट्यूब आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये नाझिया इलाही खान, दिव्या सिंग आणि त्यांच्या संपूर्ण पॉडकास्ट टीमने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अत्यंत अश्लील, आक्षेपार्ह, अपमानजनक आणि निंदनीय विधाने केल्याचा आरोप आहे.
या व्हिडिओमधील मजकुरामुळे इस्लाम धर्माच्या अनुयायांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत आहेत; तसेच या विधानांमुळे लोकांमध्ये संताप आणि अशांतता निर्माण होऊ शकते. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, या वादात पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दलच्या कथित अपमानजनक विधानांचा समावेश आहे. संबंधित व्यक्तींनी केलेली ही आक्षेपार्ह विधाने जातीय सलोखा बिघडवणारी, समुदायांमध्ये तणाव निर्माण करणारी आणि विशेषतः बेळगावमधील शांतता व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणारी ठरू शकतात त्यामुळे यावर वेळीच प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.

मुस्लिम समाज शांतता, घटनात्मक मूल्ये आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे, हे निवेदन कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने सादर केले जात आहे, ज्यामध्ये राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याची विनंती केली जात आहे, जेणेकरून कोणतीही व्यक्ती यूट्यूब/सोशल मीडियासारख्या सार्वजनिक व्यासपीठांचा गैरवापर करून आदरणीय धार्मिक व्यक्तींचे फोटो टाकून जातीय भावना भडकवू शकणार नाही.
एकंदर परिस्थितीत, आपणास विनंती आहे की, आपण धर्माचा हेतुपुरस्सर अपमान करणे, धार्मिक भावना दुखावणे, वैरभाव वाढवणे, सार्वजनिक उपद्रव निर्माण करणारी विधाने करणे यांसारख्या तथ्यांवर लागू होणाऱ्या कायद्याच्या तरतुदींनुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा/एफआयआर दाखल करावा. तसेच भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि प्रक्रियात्मक कायद्यातील इतर लागू तरतुदींनुसारही कार्यवाही करावी.
संबंधित यूट्यूब सोशल मीडिया व्हिडिओ, यूआरएल, चॅनल तपशील, प्रतिलेख, अपलोड रेकॉर्ड आणि संबंधित डिजिटल पुराव्यांची तात्काळ तपासणी करून ते जतन करण्याचे निर्देश द्यावेत. सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना आणि संबंधित क्षेत्रातील पोलिसांना आक्षेपार्ह व्हिडिओची तात्काळ डिजिटल फॉरेन्सिक पडताळणी करण्याचे निर्देश द्यावेत. या पडताळणीमध्ये व्हिडिओची सत्यता, स्रोत, प्रसाराचा प्रकार आणि त्यातील मजकूर मूळ, संपादित, बनावट किंवा एआय-निर्मित आहे का? याची पडताळणी केली जावी कारण संबंधित व्यक्तीने कथितरित्या ही विधाने नाकारली असून तो व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. जर एखादी सामग्री आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर असल्याचे आढळल्यास, कायद्यानुसार ती यूट्यूब किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यासाठी किंवा ती ब्लॉक करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत.
जातीय सलोखा राखण्यासाठी आणि शांतता भंग होण्यापासून रोखण्यासाठी बेळगाव शहर आणि जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जातीय अशांतता भडकवण्याच्या उद्देशाने अशी बेकायदेशीर सामग्री तयार करणे, प्रकाशित करणे, प्रसारित करणे किंवा तिचा प्रसार करणे यांत सहभागी असलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी शहरातील मुस्लिम बांधव संख्येने उपस्थित होते.




