३२ वर्षे शिक्षणाची अखंड साधना; मुख्याध्यापक एन. डी. पाटील उद्या सेवानिवृत्त
बेळगाव लाईव्ह :
विद्यार्थ्यांच्या यशासाठी आयुष्यभर झटणारे, शिस्त, गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा वारसा जपणारे मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार विजेते एन. डी. पाटील हे तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर उद्या, मंगळवार (३० जून) रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या गौरवशाली सेवेला सलाम करण्यासाठी सकाळी ११ वाजता चव्हाट गल्ली येथील जिजामाता हायस्कूलच्या आवारात सेवानिवृत्ती सत्कार व सदिच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास रणजित एन. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
१९९५ मध्ये सुरू झालेला शिक्षणप्रवास
१२ जून १९९५ रोजी मराठा मंडळ हायस्कूल, खानापूर येथून अध्यापनाची सुरुवात करणाऱ्या एन. डी. पाटील यांनी आर.पी.डी. कॉलेजमधून पदवी, क्रांतीवीर संगोळी रायण्णा कॉलेजमधून बी.एड., धारवाडच्या के.यू.मधून एम.ए. तसेच आर.एल. लॉ कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. २०१० मध्ये त्यांची सेंट्रल हायस्कूल, बेळगुंदी येथे बदली झाली. इतिहास विषयाचे प्रभावी अध्यापन आणि प्रेरणादायी व्याख्यानांमुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
एनसीसीमध्येही ठसा
अध्यापनाबरोबरच त्यांनी एनसीसी अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. नागपूर-कामठी येथे प्रशिक्षण पूर्ण करून १९९९ ते २०१० या काळात अनेक राष्ट्रीय शिबिरांमध्ये सहभाग घेतला. २००४-०५ मध्ये गोव्यात झालेल्या ‘ओशन टू स्काय’ शिबिरात कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांचे कंटिनजंट कमांडर म्हणून नेतृत्व केले. याच शिबिरात त्यांना ‘बेस्ट ए.एन.ओ.’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रातील मोलाचे योगदान
बेळगाव शहर समाजविज्ञान फोरमचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तसेच एसएसएलसी समाजविज्ञान पाठ्यपुस्तकाच्या भाषांतरापासून प्रश्नपत्रिका कार्यशाळांपर्यंत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय यश
२०२२ मध्ये जिजामाता हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने उल्लेखनीय प्रगती केली. २०२४ मध्ये शाळेला ‘सर्वोत्कृष्ट शाळा’ पुरस्कार मिळाला, तर २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावीचा १०० टक्के निकाल लावण्याची ऐतिहासिक कामगिरी शाळेने केली. सध्या शाळेत ४०० हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
पुरस्कारांनी गौरवलेली कारकीर्द
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत २०२३ मध्ये ‘जिल्हा आदर्श मुख्याध्यापक’ आणि २०२५ मध्ये ‘राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
शिस्त, गुणवत्ता, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि शिक्षणावरील अपार प्रेम यामुळे एन. डी. पाटील यांनी हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. त्यांच्या सेवेला कृतज्ञ मानवंदना अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास सर्व आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




