बेळगाव लाईव्ह: हिंडाल्को कंपनीच्या स्थानिक रोजगार भरती प्रक्रियेत गौंडवाड गावाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी गौंडवाड (ता. जि. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवस्थान पंच कमिटीच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
हिंडाल्को कंपनीने अलीकडेच प्लांटमधील काही पदांसाठी जवळील निवडक गावांतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, पात्र गावांच्या अंतिम यादीतून गौंडवाड गावाचे नाव वगळण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या स्थापनेपासून गौंडवाड हे ‘प्राथमिक प्रभाव क्षेत्रा’तील (Primary Impact Zone) गाव असून, औद्योगिक प्रकल्पामुळे गावातील नागरिकांना पर्यावरणीय परिणामांना सामोरे जावे लागले आहे. तसेच कंपनीच्या विस्तारासाठी गावातील शेती व निवासी जमिनीही संपादित करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी सीएसआर योजनांसह विविध सुविधांचा लाभ परिसरातील कंग्राळी बी.के., यमनापूर, काकती, मुत्यानट्टी, कणबर्गी, बस्सनकोळ आणि गौंडवाड या गावांना समानपणे देण्यात आला होता. त्यामुळे रोजगाराच्या संधींपासून केवळ गौंडवाडला वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना न्याय्य, पारदर्शक आणि समान संधी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून गौंडवाडचा पात्र गावांच्या यादीत समावेश करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी विनायक पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, बाधित गाव म्हणून गौंडवाडला रोजगाराच्या संधींसह इतर सर्व सुविधांचा समान लाभ मिळाला पाहिजे, असे सांगितले. या प्रसंगी गौंडवाड गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




