बेळगाव लाईव्ह : कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बेळगावच्या रविवार बाजारात सध्या व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजारातून स्थलांतरित करून त्यांना एपीएमसी परिसरातील रिकामे गाळे देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासंदर्भात बाजार समितीने कृषी विपणन विभागाकडे परवानगी मागितली असून विशेष जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
जय किसान व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या खासगी भाजीपाला बाजाराचा परवाना सप्टेंबर 2025 मध्ये संपल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार एपीएमसीच्या रविवार बाजारात तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्यात आली होती. 1 ऑक्टोबर 2025 पासून हे व्यापारी रविवार बाजारात व्यवसाय करत आहेत. प्रारंभी तीन महिन्यांच्या शुल्कातूनही त्यांना सूट देण्यात आली होती.
मात्र एपीएमसीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, रविवार बाजार हा शेतकऱ्यांना थेट विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा कायमस्वरूपी व्यवसाय सुरू ठेवणे नियमांना धरून नसल्याचे समितीचे मत आहे.
दरम्यान, एपीएमसी परिसरातील रिकामे गाळे, दुकाने आणि गोदामे वाटप करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र संबंधित व्यापाऱ्यांनी अर्ज दाखल केले नव्हते. यामुळे जिल्हा प्रभारी मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांना एपीएमसी परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याअनुषंगाने आता विशेष जाहिरात प्रसिद्ध करून केवळ जय किसान खासगी बाजारातील व्यापाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत अर्ज न करणाऱ्या व्यापाऱ्यांना रविवार बाजारातून हटविण्याची अटही जाहिरातीत नमूद करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे एपीएमसीतील रविवार बाजार पुन्हा शेतकरी-केंद्रित करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




