belgaum

हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याचा आढावा; गुणवंत विद्यार्थिनींचा उत्साहात गौरव

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गणेशपूर-हिंडलगा येथील इम्पोरिया टॉवरमध्ये धनंजय जाधव मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेली 29 व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक आणि मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दहावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

जानेवारी महिन्यात श्री मळेकरणी देवस्थान परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या 29 व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हजारो हिंदू बांधव-भगिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्याच्या विविध पैलूंवर यावेळी चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते तथा भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव होते. यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, शंकर पाटील, माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगांवकर, प्रदीप पाटील, तिम्माजी मोरे, भुजंग सादगुडे, सिद्धाप्पा हुक्केरी, भरमा गोमानाचे, अनिल पाटील, पंकज घाडी, शडाक्षरी हिरेमठ, सूर्याजी बीर्जे, उमेश पुरी, बाळू भडगावी, अनिल केसरकर यांच्यासह बेळगाव ग्रामीणमधील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

सभेत मल्लाप्पा बेळगांवकर, मारुती पाटील आणि पंकज घाडी यांनी मनोगत व्यक्त केले. तर नारायण पाटील यांनी हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याचा सविस्तर अहवाल सादर करून आयोजनातील विविध बाबींचा आढावा मांडला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बेळगाव ग्रामीणमध्ये प्रथम आलेली प्राजक्ता उत्तम चौगुले, बेळगाव ग्रामीण कन्नड माध्यमात प्रथम आलेली राधिका चंद्रशेखर बंगारी, बेळगाव शहर मराठी माध्यमात प्रथम आलेली स्नेहा यल्लाप्पा हीरोजी, बेळगाव शहर इंग्रजी माध्यमात प्रथम आलेली साईशा पवन देसाई, हायर एज्युकेशन स्कॉलरशिप टेस्टमध्ये यशस्वी ठरलेली तृप्ती देसाई तसेच राज्यात प्रथम क्रमांक मिळविणारी दिव्या प्रदीप देसाई यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सर्व विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, फळांची टोपली आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या यशामागील प्रेरणादायी प्रवास कथन करत या गौरवाबद्दल धनंजय जाधव यांचे आभार मानले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलींना योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत अधिक व्यापक चिंतन आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

अध्यक्षीय समारोपात धनंजय जाधव यांनी हिंदुत्ववादी कार्याची गरज, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या तीन दशकांपासून साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “आपले अस्तित्व हे कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या अतीव प्रेमावर टिकून आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि देणगीदारांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.