belgaum

अवैध दारू विक्रीवर कारवाई; एक ताब्यात, गांजा सेवन प्रकरणातही गुन्हा

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग आणि खडेबाजार पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये अवैध दारू विक्री व अमली पदार्थ सेवन प्रकरणी गुन्हे नोंदवून दोघांविरुद्ध कारवाई केली आहे.
दि. १३ जून २०२६ रोजी उद्यमबाग येथील अरुण फॅक्टरीजवळ सार्वजनिक ठिकाणी कोणतीही वैध परवानगी नसताना गोवा राज्यातून आणलेली दारू बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय प्रवीण बिरादार व त्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत देवेंद्र नारायण नाईक (वय ४१, रा. बालकूर, ता. होन्नावर) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून मॅजिक मोमेंट व्होडका, इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्की, ओल्ड मंक रम, रिझर्व्ह सेव्हन व्हिस्की आणि डीएसपी ब्लॅक या विविध मद्यब्रँडच्या एकूण ११.५ लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत ₹४,५२० इतकी आहे. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४/२०२६ दाखल करण्यात आला असून कर्नाटक आबकारी अधिनियम १९६५ च्या कलम ३२ व ३४ अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या कारवाईत खडेबाजार पोलिसांनी सरदार ग्राऊंड परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या सुधीर नंदकुमार सालगुडे (वय ३८, रा. बसवण गल्ली, शहापूर) याला ताब्यात घेतले. पीएसआय एस. आर. मुत्ती व त्यांच्या पथकाने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता त्याने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५/२०२६ दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायद्याच्या कलम २७(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
या दोन्ही कारवायांबद्दल संबंधित पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

काकती व एपीएमसी पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धाड; २६ जण ताब्यात


बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील काकती आणि एपीएमसी पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये जुगार अड्ड्यांवर धाड टाकून एकूण २६ जणांना ताब्यात घेतले असून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १३ जून २०२६ रोजी काकती पोलिसांनी होनगा औद्योगिक क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. आरोपी इस्पिकच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय मृत्युञ्जय मठद व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत २० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ₹१ लाख ६० हजार ४६५ रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते जप्त करण्यात आले. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५०/२०२६ अंतर्गत कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एपीएमसी पोलिसांनी शाहूनगर परिसरातील एका सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ६ जणांना ताब्यात घेतले. पीएसआय विठ्ठल हावण्णवर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते जप्त करण्यात आले असून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२६ अंतर्गत कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू असून यशस्वी कारवाई करणाऱ्या संबंधित पीएसआय व पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.