बेळगाव लाईव्ह : तब्बल १९४ वर्षांचा इतिहास, राजा-प्रजेच्या नात्या पलीकडची भक्ती आणि महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमांना एकाच धाग्यात गुंफणारा एक अलौकिक सोहळा… जेव्हा अंकलीच्या राजवाड्यातून ‘मोती’ आणि ‘हिरा’ नावाचे दोन राजेशाही अश्व बाहेर पडतात, तेव्हा केवळ एक वारी सुरू होत नाही, तर सीमाभागातील लाखो काळजांची पंढरीकडे पायी दौड सुरू होते. हैबतबाबा आरफळकर यांनी सुरू केलेल्या परंपरेची हीच ती पवित्र पाऊलखूण आहे, जी आज शितोळे सरकारच्या तीन पिढ्या तितक्याच निष्ठेने आळंदीपर्यंत पोहोचवत आहेत.
‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम’ या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या अखंड निनादाने बेळगावातील अंकली नगरी न्हाऊन निघाली असून, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीतील पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले मानाचे अश्व आळंदीकडे मार्गस्थ झाले आहेत. श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली येथील ऐतिहासिक राजवाड्यावरून माऊलींचा मुख्य अश्व ‘मोती’ आणि जरीपटक्याचा अश्व ‘हिरा’ यांनी आपल्या ३०० किलोमीटरच्या पायी प्रवासाला प्रारंभ केला असून हा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी सीमाभागातील हजारो भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. वारी सोहळ्याला विशेष महत्त्व आणि शिस्तबद्ध स्वरूप मिळवून देणारे हैबतबाबा आरफळकर यांच्या काळापासून अश्वांचा आणि माऊलींच्या तंबूचा मान हा शितोळे घराण्याकडे चालत आला असून, पिढ्यान्-पिढ्या चालत आलेली ही पवित्र परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार, त्यांचे पुत्र महादजीराजे व विहानराजे शितोळे सरकार अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने पुढे चालवत आहेत.
प्रस्थानाच्या दिवशी सकाळी ठीक १० वाजता अंकली येथील राजवाड्यातील अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजन करून मुख्य आरती करण्यात आली, ज्यामध्ये वारीचे वैभव असलेल्या जरीपटक्याचेही शास्त्रोक्त पूजन झाले. यानंतर चिकोडी-सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते दोन्ही अश्वांचे विधीवत पूजन करण्यात आले. हा सोहळा भक्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचला जेव्हा दिंडीसह दोन्ही अश्व राजवाड्याच्या मुख्य वेशीतून बाहेर पडले, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या सुवासिनींनी अश्वांच्या पायांवर पाणी घालून, औक्षण करत आणि पुष्पवृष्टी करत भावपूर्ण दर्शन घेतले. गावातील पारंपरिक मार्गावरून मार्गस्थ होत ही मिरवणूक जेव्हा वेशीपाशी आली, तेव्हा संपूर्ण गावाने अत्यंत जड अंतःकरणाने या अश्वांना निरोप दिला.

या ऐतिहासिक प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कापशीकर राणोजीराजे घोरपडे, पुणे येथील राजाभाऊ थोरात, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख विक्रम महाराज मोरे, संत सेवक विलास तात्या बालवडकर, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर आणि सचिव सौरभ शिंदे उपस्थित होते. यासोबतच संत ज्ञानेश्वर पादुका मंदिराचे विश्वस्त संदीप काळे, योगेश गोंधळे, योगेश आरू, बेळगावच्या मराठी संवर्धन संघटनेचे अनिल चौधरी, नितीन कपलेश्वरी, श्री बेरगी, शिवराज पाटील, बेळगावच्या राजश्री हलगेकर आणि ज्ञानेश्वरी कार्लेकर यांच्यासह अश्वत शितोळे, रणजित शिरशेट, तुकाराम पाटील, पांडूरंग वड्डर आणि अंकली, जुगूळ, चंदूर, मांजरीवाडी, काडापूर परिसरातील हजारो वारकरी व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ३०० किलोमीटरच्या कठीण आणि तितक्याच भक्तीमय पायी प्रवासात दोन्ही अश्वांची संपूर्ण काळजी घेण्याची आणि सेवा बजावण्याची महत्त्वाची जबाबदारी अश्व चालक म्हणून तुकाराम कोळी आणि अक्षय परीट हे पार पाडणार आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक सीमांना जोडणारा हा सोहळा असून, अंकली येथून निघालेले हे मानाचे अश्व मिरज, सांगली, इस्लामपूर, सातारा आणि पुणे मार्गस्थ होत आळंदीमध्ये दाखल होतील, जिथून पुढे माऊलींच्या संजीवन समाधीला प्रदक्षिणा घालून ते मुख्य आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आकर्षण केंद्र ठरतील.




