belgaum

सहकार तत्त्वे समजून काम करा : मेणसे

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : “या देशातील गोरगरीब आणि सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभे करणे हा सहकार क्षेत्राचा आत्मा आहे. मात्र, सहकार क्षेत्रासमोर स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. त्याला सरकारची धोरणेही काही प्रमाणात कारणीभूत आहेत,” असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.

अनगोळ रोड येथील आदर्श मल्टीपर्पज सहकारी सोसायटीच्या कर्मचारी व संचालकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने रविवारी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मार्गदर्शक म्हणून प्राचार्य आनंद मेणसे तसेच झुवारी ॲग्रो केमिकल्सचे निवृत्त उपाध्यक्ष आर. वाय. पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आदर्शचे चेअरमन एस. एम. जाधव होते.

प्राचार्य मेणसे म्हणाले, “सहकार क्षेत्र हे प्रामुख्याने आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे. जगातील इतर देश आणि भारत यांच्यात आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीत मोठी तफावत आहे. आपल्या देशातील आर्थिक क्षेत्राचे तीन प्रमुख भाग आहेत. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व सोसायट्या तसेच खासगी आणि कॉर्पोरेट बँकांचा समावेश होतो.”

 belgaum

भारताच्या सहकार चळवळीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, “व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ नंतर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय जनतेच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन १७७० मध्ये कलकत्ता येथे ‘हिंदुस्तान बँक’ सुरू करण्यात आली.”

“१८६० ते १८९० या काळात देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे आणि सावकारांकडून होणाऱ्या शोषणामुळे ब्रिटिश सरकारने १९०४ मध्ये सहकारी कायदा लागू केला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी १९१२ मध्ये कोल्हापूर येथे पहिली सहकारी सोसायटी सुरू केली. त्यामध्ये एक ते पाच रुपयांपर्यंत कर्ज दिले जात असे. पुढे तिचे रूपांतर शाहू बँकेत झाले.”

साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले, “सावकारी नष्ट करायची असेल तर जनता साक्षर झाली पाहिजे, हा विचार महात्मा गांधी यांनी मांडला. बेळगाव भागात गुरुवर्य शामराव देसाई, बहिर्जी शिरोळकर यांनी २९१ शाळा, तर बाबुराव ठाकूर यांनी सुमारे २०० शाळा सुरू करून साक्षरतेचे कार्य केले. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक हजारांहून अधिक शाळा स्थापन करून हेच कार्य पुढे नेले. त्यामुळे शिक्षण आणि सहकार ही दोन्ही क्षेत्रे हातात हात घालून विकसित झाली.”

“आज सहकार चळवळीसमोर अंधश्रद्धा निर्मूलनाचेही मोठे आव्हान आहे. या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी कर्जदार आणि ठेवीदार यांना जागरूक करण्याची गरज आहे. त्यासाठी कर्मचारी वर्गाने सहकार क्षेत्राचे सखोल ज्ञान घेऊन काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

दुसऱ्या सत्रात झुवारी ॲग्रो केमिकल्सचे निवृत्त उपाध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “प्रेरणा ही ज्योतीप्रमाणे असते. जोपर्यंत तिला इंधन मिळते, तोपर्यंत ती प्रज्वलित राहते. पैसा, मान्यता आणि जीवनशैली या प्रेरणादायी गोष्टी असल्या तरी अर्थपूर्ण जीवन अधिक महत्त्वाचे आहे.”

“बाह्य प्रेरणेपेक्षा स्वयंप्रेरणा अधिक प्रभावी असते. आपण करत असलेल्या कामाबद्दल अभिमान आणि समाधान असणे आवश्यक आहे. माझी जबाबदारी काय आहे, मी हे काम का करतो, याची जाणीव ठेवून काम केल्यास निश्चितच यश मिळते,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आपण ज्या संस्थेत काम करतो, तिचे ध्येय आणि उद्दिष्टे समजून घेतली पाहिजेत. यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीने जबाबदारी स्वीकारून काम करणे गरजेचे आहे. ग्राहक हा कोणत्याही व्यवसायाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे ग्राहकांची सुरक्षितता आणि समाधान यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी एस. एम. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनंत लाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दिगंबर राऊळ आणि ईश्वर मेलगे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. उपाध्यक्ष नेमिनाथ कंगराळकर यांनी आभार मानले.

या प्रशिक्षण शिबिरामुळे नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.