बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील (BDFA) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने (KSFA) विद्यमान बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त करत हंगामी समितीची नियुक्ती केली असून, पुढील ६० दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या व्यवस्थापन मंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बेळगाव येथे झालेल्या बैठकीत राज्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अॅन्थोनी यांनी विद्यमान अध्यक्ष पंढरी परब आणि संलग्न क्लबच्या प्रतिनिधींना बरखास्तीचे पत्र सुपूर्द केले.
राज्य संघटनेने राम हदगल यांची हंगामी अध्यक्ष, राजेश जाधव यांची सचिव आणि लेस्टर डिसोजा यांची खजिनदार म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या सर्व नोंदी, बँक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचा ताबा तातडीने नव्या समितीकडे सुपूर्द करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य संघटनेचे सचिव एम. कुमार यांनी पुढील ६० दिवसांत लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगितले. नव्याने निवडून येणाऱ्या कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२७ पर्यंत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. इलेव्हन स्टार क्लबची मालकी पंढरी परब यांच्याकडून काढून मूळ मालक हमीदशेठ यांच्याकडे परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, बीडीएफएचे युनियन बँकेतील खाते गोठविण्याचे आदेश देण्यात आले असून, आर्थिक व्यवहार नव्या समितीच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील प्रशासकीय अनिश्चितता संपुष्टात येण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांनंतर संघटनेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा फुटबॉल वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.





