बेळगावमधील पाण्याचे मुख्य स्रोत आटल्याने ग्रामीण भागात टंचाई
जिल्ह्यातील १३४ तलावांवर भूमाफियांचे अतिक्रमण
बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील पाण्याचे मुख्य स्रोत असलेले तलाव वाचवण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील १,१३२ तलावांपैकी १३४ तलावांवर अतिक्रमण झाले असून, अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण आणि शहरी भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण १,१३२ तलाव आहेत, मात्र त्यापैकी १३४ तलावांवर आधीच अतिक्रमण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ८७ तलावांवरील अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे. ५० हून अधिक तलावांवर स्थानिक शेतकऱ्यांनी कब्जा केला असून, अशा ठिकाणचे अतिक्रमण हटवणे प्रशासनासाठी कठीण झाले आहे. एकीकडे तलाव कोरडे पडत असताना दुसरीकडे भूमाफियांकडून तलावातील मातीची अवैध लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
दुसरीकडे, जिल्हाधिकाऱ्यांनी तलावांच्या संरक्षणासाठी पावले उचलली जात असल्याचे म्हटले आहे. मनरेगा (नरेगा) योजनेच्या माध्यमातून तलावांच्या कडेला बांध घालणे आणि सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच ‘लँड बीट ॲप’च्या (Land Beat App) माध्यमातूनही तलावांच्या संरक्षणावर लक्ष ठेवले जात असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
असे असले तरी वस्तुस्थिती मात्र भीषण आहे. कडक उन्हामुळे तलाव कोरडे पडत असून चिक्कबगेवाडी येथील दोन मोठे तलाव पूर्णपणे आटले आहेत. या तलावांमधील गाळ न काढल्यामुळे आणि अवैध माती उत्खननामुळे या परिसराला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. प्रशासनाचे संरक्षणाचे दावे कागदावरच असून प्रत्यक्षात मात्र पाण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
एकीकडे प्रशासन कागदोपत्री नवनवीन ॲप्स आणि योजनांचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र बेळगावचे ऐतिहासिक तलाव समस्यांच्या विळख्यात अडकले आहेत. ही अतिक्रमणे वेळीच हटवली नाहीत, तर भविष्यात बेळगावचे अस्तित्वच धोक्यात येईल, हे मात्र नक्की.




