belgaum

मुचंडी येथे उद्यापासून श्री महालक्ष्मी, श्री मरगाई देवी यात्रेला प्रारंभ

0
329
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मुचंडी (ता. जि. बेळगाव) येथे 30 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच उद्या मंगळवार दि. 12 ते बुधवार दि. 27 मे 2026 या कालावधीत श्री महालक्ष्मी, श्री मरगाई देवी यात्रा उत्सव -2026 चे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पूर्वतयारीवर आज सोमवारी अखेरचा हात फिरवण्यात आला.

मुचंडी गावच्या ग्रामदेवतांच्या कृपाशीर्वादाने उद्या मंगळवारपासून 9 दिवसांच्या कालावधीत भरणाऱ्या उपरोक्त यात्रेसंदर्भात यात्रोत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव लाईव्हला पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली. उद्या मंगळवारी सूर्योदयासमयी सकाळी 6:07 वाजता अक्षतारोपण होणार असून सकाळी 7 वाजता होम हवन होईल. त्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून देवस्थान पंच कमिटी व हक्कदारांनंतर ग्रामस्थांच्यावतीने देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.

दुसऱ्या दिवशी बुधवारी 13 मे रोजी दुपारी तीन वाजता श्री महालक्ष्मी, श्री मरगाई देवीच्या मंडपा समोर रंगमांडणी, गुरुवारी 14 मे रोजी रात्री 9:30 वाजता नव कर्नाटक युवक संघाच्यावतीने श्री गणपती मंदिरासमोर मनोरंजनात्मक ‘गुडूग व्हडेद गरुड’ हे कन्नड नाटक, तर रविवारी 17 मे रोजी रात्री 10 वाजता लक्ष्मी गल्ली येथे लावणी कार्यक्रम होणार आहे.

 belgaum

यात्रा उत्सवाच्या निमित्ताने भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले असून हे मैदान सोमवारी 18 मे रोजी दुपारी 3 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तयार केलेल्या आखाड्यामध्ये भरणार आहे. अखेर बुधवारी 20 मे रोजी सायंकाळी 7 वाजता महाआरती झाल्यानंतर यात्रोत्सवाची सांगता होईल.

श्री महालक्ष्मी, श्री मरगाई यात्रेसाठी बेळगावकडून पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून गोकाकच्या बाजूने आणि मुतगा, बाळेकुंद्री या बाजूने येणाऱ्या येणाऱ्या भाविकांसाठी गावाबाहेर चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून यात्रेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या भागाचे आमदार आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी खर्च करून गावातील रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी पोलीस, आरोग्य, हेस्कॉम आणि वन खात्याचे आम्हाला सहकार्य लाभत आहे.

तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावून देवीचा आशीर्वाद घ्यावा. तसेच महिलांनी यात्रेच्या ठिकाणी वावरताना अंगावरील किमती दागिन्यांची काळजी घ्यावी. भाविकांनी खिसेकापूनपासून सावध राहावे, असे आवाहन श्री महालक्ष्मी, श्री मरगाई देवी यात्रा उत्सव कमिटी, मुचंडी यांनी केले आहे. दरम्यान, यात्रेसाठी करण्यात आलेल्या जय्यत पूर्वतयारीवर आज सोमवारी अखेरचा हात फिरवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.