belgaum

त्या..दुर्घटनास्थळी मनपा आयुक्तांकडून पाहणी

0
239
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर परिसरातील तलावाची भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने आज घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.

बेळगावमधील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तलावात पोಹण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत होती. या भीषण दुर्घटनेनंतर बेळगाव महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., नगरसेवक राजू भातकांडे आणि अभियंत्यांच्या पथकाने आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तलावाच्या सद्यस्थितीची पाहणी केली आणि तातಡಿने घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायांबाबत मालकांशी चर्चा केली.

पाहणीनंतर बोलताना आयुक्त कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले की, या तलावाची जागा खासगी मालकीची आहे. अलीकडे झालेल्या पावसामुळे तलावाच्या दुसऱ्या बाजूची भिंतही कोसळली असून ती अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून तलावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल विभाग आणि अभियंत्यांनी संयुक्तपणे या जागेचे सर्वेक्षण केले असून पुढील धोका टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याची माहिती कार्तिक एम. यांनी दिली.

 belgaum

नगरसेवक राजू भातकांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली की, तलावाच्या मालकांशी सभेमध्ये चर्चा करून सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देण्यास सांगितले आहे. भविष्यात तलावाचे पुनरुज्जीवन आणि विकास कामे हाती घेऊन अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, याची काळजी घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लवकरच या भागात संरक्षक भिंत बांधण्यासह इतर आवश्यक कामे सुरू होतील, असे राजू भातकांडे यांनी सांगितले.

बेळगावमधील या दुर्दैवी घटनेने खासगी आणि सार्वजनिक तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी या प्रकरणी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले असून, खासगी मालकांना केवळ नोटीस न बजावता प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक भिंत उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील इतरही धोकादायक वास्तू आणि जुन्या विहिरींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तूर्तास, कपिलेश्वर मंदिर परिसरातील या तलावाभोवती बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद करण्यात आला असला, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासकीय इच्छाशक्ती आणि मालकांचे सहकार्य किती लाभते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.