बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील प्रवासी अवाजवी भाडे आकारणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांच्या शोषणाला बळी पडत असून प्रशासनाने तात्काळ मीटर आधारित दर लागू करावेत, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
हुबळीहून बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर आलेल्या सतीशला धक्का बसला, जेंव्हा एका ऑटोरिक्षा चालकाने महांतेशनगरपर्यंतच्या 3 कि.मी.च्या प्रवासासाठी जे भाडे सांगितले ते सतीशने बसने बेळगावपर्यंत येण्यासाठी केलेल्या जवळपास 100 कि.मी. प्रवासाच्या भाड्यापेक्षा जास्त होते.
शहराच्या बस स्थानकासह रेल्वे स्थानक आणि परगावच्या बसेसच्या इतर थांब्यांवर येणाऱ्या अनेक प्रवाशांचा हा अनुभव आहे, जिथे त्यांच्याकडून नियमितपणे जास्त भाडे आकारले जाते असा आरोप आहे. स्थानिक रहिवासी सांगतात की, अत्यंत गरज असल्याशिवाय ते अनेकदा ऑटो रिक्षा वापरणे टाळतात. तथापी ठराविक वेळेत सार्वजनिक वाहतुकीचे मर्यादित पर्याय असल्याने वाढीव भाडे देण्याशिवाय प्रवाशांकडे दुसरा पर्याय उरत नाही, असा त्यांचा दावा आहे.
10,000 नोंदणीकृत ऑटो : बेळगाव शहरात 10,000 हून अधिक नोंदणीकृत ऑटोरिक्षा कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त प्रवासी आणि अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार बनावट परवाने किंवा नोंदणी क्रमांक नसलेली 3,000 हून अधिक वाहने विशेषतः बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाजवळ रात्री उशिरा बेकायदेशीरपणे चालतात. प्रवाशांनी अनेक वाहनांची दयनीय अवस्था आणि सुरक्षा मानकांच्या अभावाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.
कामामुळे वारंवार उशिरा घरी परतणारे रमेश आणि उमेश म्हणाले की, खर्च कमी करण्यासाठी ते अनेकदा लांब अंतर चालणे किंवा त्याच दिशेने प्रवास करणाऱ्या इतरांसोबत शेअर रिक्षा करणे पसंत करतात. “रात्रीचे भाडे पूर्णपणे मनमानी आहे आणि त्यापुढील वेळेसाठी जे योग्य आहे ते सांगितले जात नाही,” असे ते म्हणाले.
या परिस्थितीवर विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. संगीता, रुखसाना आणि इतर अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत किंवा बस चुकल्यामुळे कॉलेजला उशिरा पोहोचण्याचा धोका असतानाही ते ऑटो रिक्षात बसायला कचरतात. “आम्ही सहसा एकत्र प्रवास करतो आणि भाडे परवडण्यासाठी चालकांशी घासाघीस करतो,” असे सांगताना अधिकाऱ्यांनी मीटर आधारित भाड्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
दुसरीकडे ऑटोरिक्षा चालकांनी स्वतःचा बचाव करताना सांगितले की, शहराचा भौगोलिक विस्तार आणि कामकाजातील आव्हानांमुळे निश्चित भाडेप्रणाली टिकवणे अवघड झाले आहे. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, 5 आसनी आणि 7 आसनी ऑटोरिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, रस्ते वाहतूक प्राधिकरणाने (आरटीए) ऑटोरिक्षांसाठी मीटर आधारित भाडेप्रणाली लागू करण्याचा ठराव आधीच केला आहे, परंतु अंमलबजावणीची जबाबदारी परिवहन विभागावर आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी नागेश मुंडास यांनी सांगितले की, सुधारित भाडेप्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे.
आरटीएने किमान भाडे आणि पुढील कि.मी.साठीचे दर आधीच निश्चित केले आहेत. तथापि, इंधनाच्या किमती आणि पश्चिम आशियातील युद्धाच्या परिस्थितीमुळे आरटीएच्या दोन बैठका होऊ शकल्या नाहीत. लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंडास म्हणाले.




