बेळगाव लाईव्ह: आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वातावरणातही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण उद्यमबाग येथील जयश्री फर्निचरचे मालक तथा महाराष्ट्र एकीकरण समिती धामणे विभागाचे ज्येष्ठ नेते यल्लाप्पा रेमाणाचे यांनी दाखवून दिले आहे.
दुकानात सापडलेली रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रांनी भरलेली बॅग त्यांनी मूळ मालकाला प्रामाणिकपणे परत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील चिखले येथील एक कुटुंब काल सायंकाळी फर्निचर खरेदीसाठी उद्यमबाग येथील जयश्री फर्निचर येथे आले होते.
खरेदीदरम्यान त्यांच्या नकळत पैशांची आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग दुकानातच राहून गेली. काही वेळानंतर ही बाब लक्षात येताच संबंधित कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र बॅग मिळून आली नाही.
दरम्यान, आज सकाळी दुकान उघडल्यानंतर यल्लाप्पा रेमाणाचे यांच्या निदर्शनास ती बॅग आली. त्यांनी तत्काळ संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून खात्री केली. त्यानंतर बॅगेतील सुमारे ७५ हजार ८१० रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, बँकेचे पासबुक तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे मूळ मालकाच्या ताब्यात दिली.
अचानक हरवलेली बॅग आणि त्यातील मोठी रक्कम परत मिळाल्याने संबंधित कुटुंबीयांनी रेमाणाचे यांचे आभार मानले. त्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत असून “आजही प्रामाणिक माणसे समाजात आहेत” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.




