बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हासह राज्यात गो-हत्त्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. गाईंचे संरक्षण व संवर्धन करावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बेळगाव शाखेने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
बेळगाव जिल्ह्यात निरंतरपणे गाईंची तस्करी आणि गो-हत्या सुरू आहे. कर्नाटक पशु हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण विधेयक -2020 संमत होऊन तसा कायदा लागू झाला आहे तथापि हा कायदा धाब्यावर असून सरकारचा आदेश डावलून जिल्ह्यात सातत्याने गायींच्या हत्या केल्या जात आहेत. हिंदू धर्मियांची गायीमध्ये 33 कोटी देव वसतात अशी श्रद्धा आहे.

गाईंचा बळी देण्यामुळे या धार्मिक भावनेला ठेच पोहोचत आहे. सरकारने गोपालनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन गाईंचे संरक्षण व संवर्धन करावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या केल्या जाणाऱ्या गो-मांस व गाईंच्या वाहतुकीला आळा घालण्यात यावा.
या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन आपण पोलीस खाते परिवहन खाते आणि संबंधित खात्यांना गाई संदर्भातील कायदा आणि गो-हत्त्येसंदर्भात आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत. एकंदर गाईंच्या हत्त्येवर संपूर्ण बंदी घालून तिचे संरक्षण केले जावे, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी स्वामीजींसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



