बेळगाव लाईव्ह : चालू महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील रेशन दुकानांमधील ऑनलाइन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून सर्व्हर संथ गतीने चालत असल्यामुळे गोरगरीब जनतेला धान्यासाठी तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. या असह्य तांत्रिक समस्येचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि रेशन दुकानदार या दोघांनाही बसत असल्याने, आज जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. सर्व्हरच्या सुमार गतीमुळे नागरिकांच्या अंगठ्याचे ठसे स्वीकारण्यास कमालीचा विलंब होत असून, यामुळे चालू महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ चाळीस टक्के तांदळाचे वाटप पूर्ण होऊ शकले आहे, तर तब्बल साठ टक्के अन्नधान्याचे वाटप अजूनही रखडलेले आहे.
अशा बिकट परिस्थितीत अन्न नागरी पुरवठा विभागाने प्रत्येक लाभार्थ्याकडून दोनवेळा अंगठ्याचा ठसा घेण्याचा नवा जाचक नियम सक्तीचा केल्यामुळे अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे.
आधीच एकदा ठसा उमटवणे कठीण झाले असताना शासनाने दोनदा ठसा घेण्याची केलेली सक्ती पूर्णपणे अन्यायकारक असून, पुढील महिन्यापासून केवळ एकदाच ठसा घेण्याची मुभा द्यावी आणि सर्व्हरचा हा त्रस्त करणारा प्रश्न कायमचा निकालात काढावा, अशी आग्रही मागणी धान्य दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी राजशेखर तळवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, रेशन दुकानदारांचे हे निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले . याप्रसंगी जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




