belgaum

केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने फसवणूक: बनावट गुंतवणूक योजनेत वृद्धाची लाखोंची लूट!

0
441
 belgaum

 belgaum


बेळगाव लाईव्ह: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणूक केल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. बनावट शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी प्रकाश गुब्बी (वय 76), रा. वंटमुरी कॉलनी, बेळगाव असे असून, त्यांनी एपीएमसी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कोल्हापूर येथील आदर्श आणि बुलढाणा (महाराष्ट्र) येथील दामोदर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


तक्रारीनुसार, आरोपींनी सोशल मीडियावर केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नावाचा वापर करून आकर्षक जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. या जाहिरातींमधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते. संबंधित लिंकवर क्लिक करून नाव व संपर्क तपशील नोंदवल्यानंतर आरोपींनी फिर्यादीशी फोनद्वारे संपर्क साधला.


सुरुवातीला “गुंतवणूक खाते सुरू करण्यासाठी” ₹16,500 रक्कम फोनपे द्वारे घेतली. त्यानंतर अधिक पैसे गुंतवल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगत आरोपींनी वारंवार दबाव टाकला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रकाश गुब्बी यांनी टप्प्याटप्प्याने आरटीजीएसद्वारे एकूण ₹7.39 लाखांची रक्कम आरोपींना पाठवली.

 belgaum

मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा दिला नाही किंवा गुंतवणुकीबाबत स्पष्ट माहितीही दिली नाही. उलट, रक्कम परत हवी असल्यास आणखी पैसे गुंतवावे लागतील, असे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुब्बी यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून बँक व्यवहार आणि मोबाईल कॉल रेकॉर्डच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे.दरम्यान, प्रसिद्ध व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या आकर्षक गुंतवणूक जाहिरातींना बळी पडू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.