belgaum

मांजाचा फास!१९ वर्षीय दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मांजाच्या दोऱ्यामुळे दुचाकीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील गांधीनगर ओव्हरब्रिज परिसरात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. ध्रुव कारजगी (वय १९, रा. महांतेशनगर, बेळगाव) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, तो बेळगावहून बागेवाडीकडे दुचाकी चालवत जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव हा गांधीनगर ओव्हरब्रिज परिसरातून दुचाकीवरून जात असताना त्याच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या ट्रकला मांजाचा लोंबकळणारा धागा अडकल्याने तो धागा गळ्याभोवती घट्ट ओढला गेला. त्यामुळे ध्रुवच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रसंगात दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या बाजूला कोसळला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

गांधीनगर ओव्हरब्रिज परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मळमारुती पोलीस ठाण्याच्या उत्तर वाहतूक विभागाच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 belgaum

दरम्यान, पतंगाच्या मांजामुळे घडलेल्या या दुर्घटनेने धोकादायक मांजाच्या विक्री आणि वापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कालच वडगाव परिसरात पतंग उडवताना दोन इमारतींच्या मधील जागेत पडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मांजामुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने पतंगाशी संबंधित दुर्घटनांमुळे शहरात चिंता व्यक्त होत आहे.

दरवर्षी प्रशासनाकडून बेळगाव शहरात धोकादायक मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येते. मात्र, या बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. धोकादायक मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्याच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.

या घटनेची पोलीस खात्याने गंभीर दखल घेतली असून, धोकादायक मांजावरील बंदीची अंमलबजावणी अधिक कडक करण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत विशेष कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी बेळगाव लाईव्ह बोलताना दिली आहे.

पतंग उडवण्याचा आनंद कोणाच्या जीवावर बेतू नये, यासाठी प्रशासनाने धोकादायक मांजाविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.