बेळगाव लाईव्ह : भाग्यनगर येथील वृंदावन कॉलनीच्या पाचव्या क्रॉसमधील लहान मुलांसाठी राखीव असलेल्या गार्डनमध्ये सुरू असलेल्या शेडच्या बांधकामावरून स्थानिक रहिवाशांनी आक्षेप नोंदवला आहे. या कथित अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त जी. कार्तिक यांची भेट घेतली.
वृंदावन कॉलनीतील गार्डनमध्ये नवरात्रोत्सवातील देवीच्या स्थापनेसाठी शेड उभारण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत कंत्राटदाराकडे विचारणा केली असता, हे बांधकाम महानगरपालिकेकडून मंजूर झाल्याचे त्याने सांगितल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, लहान मुलांसाठी राखीव असलेल्या जागेवर अशा प्रकारचे बांधकाम करण्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून या जागेवर शेड अथवा धार्मिक स्वरूपाचे बांधकाम करण्यात येऊ नये, अशी मागणी महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. रहिवाशांनी सरकारी शुल्क भरून विकसित केलेल्या लेआउटमधील गार्डनची जागा मुलांच्या खेळासाठीच राखीव राहावी, अशी त्यांची भूमिका आहे.
या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली. त्यानंतर कोंडुस्कर यांनी महापालिका आयुक्त जी. कार्तिक यांच्याशी संपर्क साधून सदर गार्डनमधील शेडचे बांधकाम हटविण्याची मागणी केली. तसेच, दोन दिवसांत हा प्रश्न सोडविण्याची मागणी केल्याची माहिती देण्यात आली.

बेळगाव शहरात शंभरहून अधिक नवरात्रोत्सव मंडळे असताना, एका मंडळासाठी महानगरपालिकेकडून शेड उभारले जात असेल, तर अशा प्रकारची सुविधा इतर मंडळांनाही समान निकषांवर उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका कोंडुस्कर यांनी मांडली. एका मंडळाला वेगळा आणि इतरांना वेगळा न्याय लावू नये, असेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, गार्डनमधील बांधकामाबाबत महानगरपालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि रहिवाशांच्या मागणीनुसार शेड हटविण्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.





