belgaum

बीएसएफ मधून अचानक वजा केलेल्या उमेदवारांना सरकारने द्यावा न्याय -डॉ. गिरीराज शिंदे

0
175
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बीएसएफ अर्थात भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये 2023 साली रीतसर भरती होऊन प्रशिक्षण घेण्याद्वारे दोन वर्ष सेवा केलेल्या सुमारे 800 ते 900 उमेदवारांचे कौशल्य प्रमाणपत्र फेटाळून त्यांना सेवेतून अचानक मुक्त करण्यात आले असल्याची माहिती देऊन संबंधित गरीब उमेदवारांना न्याय देताना सरकारने त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी नॅशनल स्किल ट्रेनिंग पार्टनर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गिरीराज एन. शिंदे यांनी केली आहे.

बेळगाव शहरात आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बीएसएफ मध्ये संबंधित उमेदवारांची फक्त कौशल्य प्रमाणपत्रावर निवड केली गेली नव्हती, तर बरेच परिश्रम घेऊन आणि विविध परीक्षा देऊन ते उमेदवार भरती झाले होते. त्यामुळे फक्त कौशल्य प्रमाणपत्रावरून त्यांना सेवेतून काढून टाकणे कितपत योग्य आहे? असा सवाल शिंदे यांनी पुढे बोलताना केला.

गेल्या दोन वर्षापासून बीएसएफमध्ये सेवा बजावणाऱ्या उमेदवारांना अचानक नोकरीतून काढून टाकण्यात आल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. तेंव्हा सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन संबंधित उमेदवारांना पूर्ववत सेवेत रुजू करून घ्यावे.

 belgaum

तब्बल दोन वर्षानंतर कौशल्य प्रमाणपत्र बनावट असल्याचे कारण पुढे करून प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना नोकरीतून वजा करणे हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे. खरंतर या उमेदवारांना बनावट कौशल्य प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि दुसरीकडे संबंधित उमेदवारांनी शिकाऊ प्रशिक्षण (अप्रेन्टिसशिप) पूर्ण केले आहे हे लक्षात घेऊन त्यांना पूर्ववत सेवेत रुजू करून घेतले गेले पाहिजे. कारण ज्या युवकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे ते सर्व गरीब कुटुंबातील आहेत.

आजच्या घडीला ‘ना घर का ना घाट का’ अशी त्यांची परिस्थिती झाली असून ते मानसिक दृष्ट्या खचले आहेत. संबंधित युवक लेखी परीक्षेसह शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झाले आहेत त्यामुळे फक्त कौशल्य प्रमाणपत्राच्या कारणास्तव त्यांना नोकरीतून वजा करणे अन्यायकारक आहे. तरी कृपया सरकारने या युवकांना न्याय द्यावा, संपूर्ण चौकशी करून त्यांना पुनश्च बीएसएफ सेवेमध्ये रुजू करून घ्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे, असे डॉ. गिरीराज शिंदे म्हणाले.

अन्याय झालेल्या संबंधित 800 ते 900 युवकांना न्याय मिळालाच पाहिजे. कारण आपल्याला मिळालेल्या नोकरीच्या भरोशावर त्यांनी कर्ज काढून घरे बांधली आहेत. काहींनी लग्न केली असून त्यापैकी नोकरी गेल्यामुळे काहींची लग्न तुटली आहेत. बऱ्याच युवकांचे नोकरी लागल्यानंतर आई-वडिलांना पर्यटनाला घेऊन जाण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. बीएसएफ मधून काढून टाकण्यात आल्यामुळे हे युवक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत.

तब्बल 2 वर्षे सेवा बजावलेल्या या युवकांच्या बाबतीत अन्याय होता कामा नये. तेंव्हा सरकारने तात्काळ कार्यवाही करत संबंधित युवकांना पुनश्च बीएसएफ सेवेमध्ये रुजू करून घ्यावे, अशी मागणी गिरीराज शिंदे यांनी शेवटी केली. पत्रकार परिषदेस बीएसएफमध्ये भरती होऊन वजा झालेले अन्यायग्रस्त युवक देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्यावर झालेल्या अन्यायाची पत्रकारांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.