बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील ऐतिहासिक कपिलतीर्थ तलावात झालेल्या दुर्घटनेनंतर आता प्रशासन जागे झाले आहे. या तलावाच्या पुनर्बांधणी आणि सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने पावले उचलली असून येत्या गुरुवारपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कपिलेश्वर मंदिराच्या मागील तलावाचा कठडा कोसळून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली होती. या पार्श्वभूमीवर तलावाच्या मालकी हक्काचा आणि देखभालीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोडसे कुटुंबीय, युवा समिती आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली. २०१६ आणि २०२२ मध्ये हस्तांतरणाची प्रक्रिया होऊनही महानगरपालिकेने ही जबाबदारी का स्वीकारली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महानगरपालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांना दूरध्वनीवरून कडक सूचना दिल्या. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तलावाची पुनर्बांधणी, डागडुजी आणि सुरक्षेसाठी लागणारा खर्च, नकाशा आणि सविस्तर तपशील ७ मे पर्यंत सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. तसेच या कामासाठी राज्य आपत्कालीन निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लवकरच महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत कपिलतीर्थ परिसराची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ महापालिका अभियंतांना दूरध्वनीवर संपर्क साधून नेमका प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यानंतर अपघात कालीन निधीमधून तात्काळ ही समस्या सोडविण्याचे आश्वासन देत लवकरच विहिरीची पाहणी करण्याचे आश्वासन दिले “तलावाच्या सुरक्षिततेसाठी आणि हस्तांतरणातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जाईल,” अशी ग्वाही मोहम्मद रोशन यांनी दिली.
यावेळी गोडसे कुटुंबाच्या वतीने व्यंकटेश गोडसे आणि श्रीकांत गोडसे उपस्थित होते. तसेच विकास कलघटगी, कपिल भोसले, शुभम शेळके आणि धनंजय पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी या चर्चेत सहभाग घेऊन तलावाच्या दुरावस्थेकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.





