belgaum

संदीप पाटील यांची आयजीपी म्हणून धडाकेबाज एन्ट्री!

0
2777
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या पोलीस प्रशासनाच्या इतिहासात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि जनस्नेही भूमिकेने एक सुवर्णकाळ निर्माण केला, तेच धडाकेबाज आयपीएस अधिकारी संदीप पाटील तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा बेळगावात परतत आहेत.

२०१०-१३ या काळात बेळगावचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना संदीप पाटील यांनी केवळ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर सामान्य जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास कैक पटीने वाढवला होता. त्यावेळी बेळगावातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याची त्यांची पद्धत इतकी प्रभावी होती की, ते अल्पावधीतच बेळगावकरांचे लाडके अधिकारी बनले. त्यांच्या याच अफाट लोकप्रियतेची ऐतिहासिक प्रचिती तेव्हा आली होती, जेव्हा त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासाठी जनता काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण तेव्हा बेळगावने अनुभवले होते. संदीप पाटील यांची बदली झाल्याचे समजताच जात, धर्म आणि राजकारण बाजूला सारून हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कचेरीवर विराट मोर्चा काढत “संदीप पाटील यांची बदली रद्द करा” अशा घोषणांनी बेळगाव दणाणून गेले होते. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीला विरोध करण्यासाठी जनतेने स्वतःहून पुकारलेले हे कर्नाटकातील सर्वात मोठे आणि अभूतपूर्व आंदोलन ठरले होते.

 belgaum

आता तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संदीप पाटील यांची उत्तर परीक्षेत्राचे आयजीपी म्हणून नियुक्ती झाली असून, ६ मे २०२६ रोजी कर्नाटक सरकारने याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, विद्यमान आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड यांची बदली बेंगळुरू येथे सीआयडी विभागात करण्यात आली असून त्यांच्या जागी आता संदीप पाटील बेळगावची सूत्रे हाती घेणार आहेत.

बेळगावच्या इतिहासात एसपी म्हणून काम केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पदोन्नतीवर ‘आयजीपी’ म्हणून ‘री-एन्ट्री’ करणारे ते पहिलेच वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत.

गेल्या १५ वर्षांत त्यांनी बेंगळुरू शहर आणि राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, त्यांचा तो प्रदीर्घ अनुभव आता बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर परीक्षेत्रासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. ‘सिंघम इज बॅक’ अशा घोषणांसह सोशल मीडियावर बेळगावकरांनी त्यांच्या या नियुक्तीचे जंगी स्वागत केले असून, त्यांच्या आगमनामुळे गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा धडकी भरली आहे, तर सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

याच आदेशाद्वारे अनुपम अगरवाल यांची नियुक्ती संदीप पाटील यांच्या रिक्त जागी केएसआरपी मध्ये करण्यात आली आहे. १५ वर्षांपूर्वी ज्या अधिकाऱ्यासाठी बेळगावची जनता रस्त्यावर उतरली होती, तोच जननायक आता पोलीस दलाच्या सर्वोच्च पदावरून पुन्हा बेळगावकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.