बेळगाव लाईव्ह:चार वर्षांपूर्वी 2021 मध्ये घडलेल्या कनकदास कॉलनी, आंबेडकरनगर अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा मुर्ती विटंबना प्रकरणातील तिघा आरोपींची बेळगाव येथील चौथे प्रथमवर्गीय न्यायालयाच्या न्यायाधीश तेजश्री आर. यांनी साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे सुरज भरमा कंग्राळकर, ज्योतिबा मनोहर भांदुर्गे (दोघेही रा. कनकदास कॉलनी, आंबेडकरनगर अनगोळ) आणि प्रथमेश संभाजी कंग्राळकर (रा. रघुनाथ पेठ, अनगोळ) अशी आहेत. प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, बेंगलोर येथील सदाशिवनगर येथे गेल्या 17 डिसेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली होती.
त्यामुळे संतापाची लाट उसळून कोल्हापूर येथे कर्नाटकी ध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्याचप्रमाणे बेळगाव येथे धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक येथे मोठा जनसमुदाय एकत्र येऊन बेंगलोर येथील शिवमुर्ती विटंबनेचा जोरदार निषेध करण्यात आला होता. त्याच कालावधीत 18 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास काही समाजकंटकांनी कनकदास कॉलनी, आंबेडकरनगर अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली.
त्यावेळी फिर्यादी शिवराज होळीमठ यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर टिळकवाडी पोलीस आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे उपरोक्त तिघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन बेळगाव येथील चौथे प्रथमवर्गीय न्यायालयाच्या न्यायाधीश तेजश्री आर. यांनी साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. प्रताप जाधव ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. निकिता घाडगे व ॲड. प्रज्वल यांनी काम पाहिले.




