बेळगाव लाईव्ह :न्यायालयाचा आदेश डावलून हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरूच असून हे काम न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणातील शेत जमिनीत सुरू असल्याची माहिती मिळताच संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम पुन्हा बंद पाडल्याची घटना नुकतीच घडली.
हालगा -मच्छे बायपास बायपास रस्त्याच्या कामाला 2019 पासून आजपर्यंत त्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी उग्र व रस्त्यावरील आंदोलन करुन तसेच उच्च न्यायालय मनाई आदेशाने थांबवले आहे. बेळगाव जिल्हा वरिष्ठ न्यायालयाने तर बेळगावचा ‘झिरो पाॅईंट’ सिध्द झाल्याशिवाय या पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पीक जमीनीला हात लावू नये असा स्पष्ट आदेश देऊनही त्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.
तसेच वर्क ऑर्डर खोटी दाखवत पोलिस खात्याची भिती दाखवून बायपासचे काम सुरु असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दोनच दिवसांपूर्वी अनगोळ शिवारात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत काम थांबवले होते. तथापी त्यानंतर काल मंगळवारी मुसळधार पाऊसात काम न थांबवता सुरुच ठेवण्यात आले होते.
त्यावेळी चिखलामुळे ट्रक घसरू लागल्यामुळे कच्च्या रस्त्यावर दगड टाकण्यात येत होते. दगड टाकून रस्ता भक्कम करण्याचा हा प्रकार न्यायप्रविष्ठ दाव्यातील शेतकरी हणमंत बाळेकुंद्री व त्यांच्या पत्नीच्या शेतातही सुरू झाला होता. मात्र त्याची माहिती मिळताच बाळेकुंद्री दांपत्याने घटनास्थळी धाव घेऊन ठेकेदारला जाब विचारला. त्यावेळी उभयता जोरदार बाचाबाची झाल्यानंतर बाळेकुंद्री यांनी “आमच्या जागेतील सर्व दगड काढा अन्यथा आम्ही रोडरोलखाली जीव देऊ” असा इशारा ठेकेदाराला दिला.
दरम्यान घटनास्थळी जमा झालेल्या शेतकऱ्यांनी देखील बाळेकुंद्री यांना पाठिंबा देत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला विरोध करून ते बंद पाडले. परिणामी ठेकेदाराला नमते घ्यावे लागले आणि त्याने जेसीबीच्या सहाय्याने तेथील दगड काढून पुन्हा ट्रकमधे भरुन घटनास्थळावरून काढता पाय घेतला.




