बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग येथून अनगोळकडे जाणारा संपर्क रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आल्याने बेळगाव-खानापूर मार्गावरील वाहतूक समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अंडरब्रिज आणि रस्त्याच्या विकासकामांसाठी उद्यमबागहून अनगोळकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना आता खानापूर रोडमार्गे तिसरे रेल्वे गेट ओव्हरब्रिज वापरून अनगोळकडे जावे लागत आहे. परिणामी उद्यमबाग येथील बेम्को हायड्रोलिकपासून टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटपर्यंतच्या मार्गावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे.
यातच बेळगाव-खानापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही सुरू असल्याने वाहनांची गती अत्यंत मंदावली आहे. जोडरस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. आज सकाळी कॅनरा बँकेसमोरील रस्त्यावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर वाहने संथगतीने पुढे सरकत होती.
या वाहतूक कोंडीत विशेषतः तातडीच्या कामासाठी निघालेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही वाहनचालकांनी वाहतुकीच्या त्रासाला कंटाळून पर्यायी अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे इतर भागांतील रहदारीवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले.
वाहनचालकांच्या मते, प्रशासनाकडून योग्य नियोजन न करता एकाच वेळी विविध विकासकामे हाती घेतल्यामुळे दक्षिण बेळगाव भागातील वाहतुकीची समस्या अधिकच बिकट झाली आहे. अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटजवळ गेल्या काही महिन्यांपासून अंडरब्रिजचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बेमको कंपनीपासून फाउंड्री क्लस्टरपर्यंतच्या बेळगाव-खानापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित रिंग रोड योजना, हलगा-मच्छे बायपास आणि फ्लायओव्हर प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत. या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने शहरातील वाहतुकीवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सध्या सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान नागरिकांना कमी त्रास होईल, यासाठी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने प्रभावी नियोजन करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.



