बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात ‘शिवम असोसिएट्स’च्या फसवणूक प्रकरणानंतर आणखी चार वित्तीय कंपन्यांचे संशयास्पद व्यवहार समोर आले असून, नागरिकांनी अशा फसव्या संस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आणि त्यांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. जिल्ह्यात सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांचा छडा लावण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून, याद्वारे संशयास्पद संस्थांच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोणतीही अधिकृत किंवा नामांकित बँक वर्षाला ९ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाही, त्यामुळे महिन्याला अवाढव्य व्याज देणाऱ्या संस्थांच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. पैशांच्या मोहापाई कोणत्याही अनधिकृत किंवा विनापरवाना संस्थेमध्ये गुंतवणूक करून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी काही कंपन्या दरमहा ५ टक्के इतके अवास्तव व्याज देण्याचे आमिष दाखवत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावरील जाहिराती आणि नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अशा चार कंपन्यांची पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल येताच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
यापूर्वी जिल्ह्यात घडलेल्या आर्थिक गैरव्यवहारांचा दाखला देत, नागरिकांनी गुंतवणूक करताना आधी त्या संस्थेच्या वैधतेची खात्री करून घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेनेही अशा फसव्या योजनांबाबत जागरूक राहावे, असे सांगत सामान्य गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी आणि बेळगाव जिल्हा अशा आर्थिक फसवणुकीपासून मुक्त ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला.




