बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी स्वीकारल्यानंतर तातडीने प्रशासकीय आढावा बैठक घेत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
सोमवारी कॅन्टोन्मेंट सभागृहात पार पडलेल्या प्रगती आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार हरीविजय यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. एल अँड टी कंपनीने अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदाई करून ती अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत ब्रिगेडियर गणेश उपाध्ये यांनी संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे सांगत खोदलेले सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करून घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी कॅन्टोन्मेंट परिसर प्लास्टिकमुक्त करण्यावरही विशेष भर देण्यात आला. कॅन्टोन्मेंट भागात असद खान दर्ग्यासह अनेक ऐतिहासिक व पर्यटनस्थळे असल्याने सुट्टीच्या काळात येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटकांकडून प्लास्टिकचा वापर करून तो परिसरात फेकला जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे ब्रिगेडियर उपाध्ये यांनी नमूद केले.
यासाठी “प्लास्टिकमुक्त कॅन्टोन्मेंट” अशा जनजागृतीपर फलकांची उभारणी असद खान दर्ग्यासह विविध सार्वजनिक ठिकाणी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. शहरातील स्वच्छता राखण्यासाठी कचरा संकलन व उचलण्याच्या कामाची नियमित तपासणी केली जाईल, असे स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना नव्या अध्यक्षांनी दिल्या.




