बेळगाव लाईव्ह: राणी चन्नम्मा विद्यापीठात ₹32 लाखांहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली.
बुधवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपावरून काकती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान चौघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात मुरिगेश एच. एम., महेश वीरेश वाळी, संदीप बुर्ली यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असून, प्रकरणाचा सविस्तर तपास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित कागदपत्रे आणि कथित गैरव्यवहाराची व्याप्ती याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





