बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक मांडले. या बैठकीत सीमाभागातील विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
१ जून १९८६ रोजी झालेल्या ‘कन्नड सक्ती’ आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या आणि सीमाभागातील विविध आंदोलनांत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही १ जून रोजी हिंडलगा येथे एकत्र येऊन अभिवादन करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले. सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा, तसेच सरकारी कार्यालये व आस्थापनांवर मराठी फलक लावण्यासंदर्भात कन्नड संघटना आणि प्रशासनाने घेतलेल्या विरोधी भूमिकेचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती जो काही आदेश देईल, त्याला खानापूर समितीचा पूर्ण पाठिंबा राहील, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उच्चाधिकार तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने आणि इतर सदस्यांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि विरोधी पक्षनेत्यांशी विचार-विनिमय करून, मुंबईत मुख्यमंत्री निवासासमोर ‘धरणे आंदोलन’ करण्यात यावे, असा विचार बैठकीत अनेक सदस्यांनी मांडला. तसेच सर्वोच्च न्यायालयातील खटला विनाविलंब सुरू व्हावा यासाठी उच्चाधिकार आणि तज्ज्ञ समितीची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
बेळगाव महानगरपालिकेत मराठी बाणा दाखवून सीमाप्रश्न सोडवणुकीच्या विरोधी ठराव फेटाळून लावल्याबद्दल बेळगावचे मराठी नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि नगरसेविका वैशाली भातखंडे यांच्या अभिनंदनाचा ठराव खानापूर म.ए. समितीच्या वतीने एकमुखाने मंजूर करण्यात आला. तसेच २४ मे रोजी शिवस्मारक येथे मराठी युवक कार्यकर्त्यांची बैठक होऊन मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करण्याचा आणि समिती बळकट करण्याचा जो संकल्प केला, त्याबद्दल युवकांचेही कौतुक करण्यात आले.
समितीच्या तिकिटावर किंवा पाठिंब्यावर आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य आणि विविध संस्थांची पदे भूषवून नंतर राष्ट्रीय पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर माजी आमदार दिगंबर पाटील व राजाराम देसाई यांनी कडक शब्दांत टीका केली. “समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी अशा बदलू नेत्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नये. म.ए. समितीच्या ध्येय-धोरणांना बाधा येईल असे कृत्य कोणीही करू नये, कार्यकर्त्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पुढील वाटचाल करावी,” असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकी दरम्यान शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या स्थानिक समस्यांवरही चर्चा झाली. चालू हंगामात शेतकरी बांधवांना लागणारे डीएपी आणि युरिया खतांचा तुटवडा भासू नये आणि ते योग्य दरात उपलब्ध करून द्यावेत, यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी हेस्कॉमच्या (HESCOM) सहाय्यक अभियंत्यांना म.ए. समितीच्या वतीने निवेदन सुपूर्द करण्यात आले.
याच काळात देहावसान झालेले समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. टी. के. पाटील, कै. अर्जुनराव गोरल व इतर दिवंगत कार्यकर्त्यांना बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीच्या शेवटी सहसचिव रणजित पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीला तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रकाश चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, अजित पाटील, जयसिंगराव पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा मन्नोळकर, अमृत शेलार, एस.एच. गुरव, पुंडलिक पाटील, नागेश भोसले, संदेश कोडचवाडकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रमेश धबाले, व्ही. व्ही. पाटील यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि सीमाभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




