बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रशासनाशी संवाद साधत उत्तम नागरी जबाबदारीचे दर्शन घडवले आहे. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन क्रिकेटपटू एम. एस. धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याला बेळगावमध्ये आमंत्रित करावे अशी अनोखी मागणी केली, सोबतच शहरातील एका गंभीर नागरी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी गेल्या १५ दिवसांत बेळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकार्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. याच वेळी नागरी जागरूकतेचे दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या सुळसुळाटाची गंभीर समस्या जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकार्यांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि या विषयावर होणाऱ्या आगामी अधिकृत बैठकीसाठी विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रण दिले. तसेच एम. एस. धोनीला बेळगावला आमंत्रित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेची भावना म्हणून जिल्हाधिकार्यांना आंब्याचे रोपटे भेट दिले. यावेळी देविका खन्नुकर हिने या भेटीमागचा उद्देश स्पष्ट केला.
तिच्यासोबत शिवतेज खान्नुकर, अहिल्या होसूरकर, अर्जुन होसूरकर, सार्थक सायनेकर, वैभवी सायनेकर, शंतनू खान्नुकर, शर्वरी खान्नुकर, अथर्व संतोष पवार, अदिती साळुंखे, अनन्या साळुंखे, स्वराज खान्नुकर, रुदिता पवार, स्वयं पवार आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी विद्यार्थ्यांच्या या जागरूकतेचे आणि उत्साहाचे विशेष कौतुक केले.




