बेळगाव लाईव्ह : नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि सातत्याने होणारी इंधन दरवाढ याविरोधात आज बेळगावमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने प्रचंड निदर्शने करण्यात आली. येथील भाजप खासदार जगदीश शेट्टर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
केंद्रीय परीक्षा यंत्रणेतील अनागोंदी कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला. आंदोलकांनी केवळ परीक्षा घोटाळाच नव्हे, तर गगनाला भिडलेल्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमतींवरूनही प्रशासनाला धारेवर धरले. भररस्त्यात ठिय्या मांडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
भाजपच्या कार्यकाळात तब्बल अठराव्यांदा महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांची मेहनत मातीमोल झाली असून या संपूर्ण गैरप्रकाराला केंद्र सरकारचे अपयशच कारणीभूत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. खासदारांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करत ग्रामीण अध्यक्षांसह वीसहून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पोलीस प्रशासनाने आंदोलकांना वाहनात कोंडून घटनास्थळावरून दूर नेले तरीही कार्यकर्त्यांचा जोश कमी झाला नव्हता. ताब्यात घेतलेले सर्व कार्यकर्ते पोलीस वाहनातूनच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आणि वाढत्या महागाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत होते. या आंदोलनामुळे बेळगावमधील मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. या व्यापक आंदोलनाचे नेतृत्व ग्रामीण अध्यक्ष कार्तिक पाटील यांनी केले.




