बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत वाटाळ नागराज यांनी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवून महानगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत संगोळी रायण्णा चौकात वाटाळ नागराज यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले.
बेळगावमधील मराठी भाषिकांवर दबाव आणण्याच्या हेतूने वाटाळ नागराज यांनी बेळगावात तातडीची परिषद घेतली. महाजन अहवाल अंतिम मानण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेला २ जूनचा अल्टिमेटम देत ठराव मंजूर न केल्यास राज्यव्यापी बंदची वल्गना नागराज यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसवण्यात आलेल्या हलमिडी शिलालेखाच्या प्रतिकृतीचा वापर करून कन्नड संघटनांकडून शक्तीप्रदर्शन केले जात आहे. पालिकेने ठराव मंजूर करावा, अन्यथा सरकारने लोकशाही मार्गाने निवडून आलेली बेळगाव महानगरपालिका बरखास्त करावी, अशी थेट मागणी करून सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाला.
महानगरपालिकेला घेराव घालत महाजन अहवालाच्या शिफारशीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा पोलिसांनी संगोळी रायण्णा चौकात अडवला. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात तीव्र वाद झाला असून काही महिला आंदोलकांनी थेट रस्त्यावर झोपून संताप व्यक्त केला.
सीमाभागात कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याने मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण असून हा संताप अनावर झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संपूर्ण दडपशाही आणि चिथावणीखोर राजकारणाविरोधात आता महाराष्ट्र एकीकरण समितीकोणती ठोस पावले उचलणार याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.




