बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांच्यासह मराठी सीमाभागाविरोधातील महाजन अहवालाच्या विरोधात बेळगाव महापालिकेत जोरदार आवाज उठवणारे म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंके आणि शिवाजी मंडोळकर यांचा आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये आज मंगळवारी सकाळी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील, माजी सभापती सुरेश देसाई, ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील, बळीराम पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी सूर्याजी पाटील यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी, नगरसेवक रवी साळुंके आणि नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांचा मानाची शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सत्कारानंतर माजी सभापती सुरेश देसाई यांनी तिन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला. विशेषतः, प्रकाश बेळगोजी यांची संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या कार्यकारिणीवर राज्य उपाध्यक्षपदी झालेली निवड ही सीमाभागासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या धडाडीच्या पत्रकारितेचे कौतुक केले. तसेच तिन्ही सत्कारमूर्तींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राजू पाटील यांनीही समयोचित मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक केले. सत्काराबद्दल आभार मानताना तिन्ही सत्कारमूर्तींनी हाती घेतलेले कार्य यापुढेही अविरत सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.
यावेळी स्वतः संपादित केलेल्या आणि नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मराठा : परंपरा, वर्तमान आणि भविष्य’ या पुस्तिकेचा संच संपादक प्रकाश बेळगोजी यांनी खानापूर तालुका म. ए. समितीच्या अध्यक्षांकडे तालुक्यात वितरणासाठी सुपूर्द केला. या पुस्तिकेबाबत समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रशंसोद्गार काढत, ही अभ्यासपूर्ण आणि वास्तवावर आधारित पुस्तिका मराठा समाजाला योग्य दिशा देण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.



