belgaum

त्यांनी ५१ वर्षांनी जागवल्या शाळेच्या आठवणी

0
 belgaum

स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमेळावा उत्साहात

बेळगाव लाईव्ह:
काळ पुढे सरकत गेला… प्रत्येकजण आपल्या आयुष्याच्या वाटेवर स्थिरावला… कुणी अधिकारी झाले, कुणी उद्योगात रमले, तर कुणी संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झाले. पण तब्बल ५१ वर्षांनंतर जेव्हा स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या १९७५-७६ च्या दहावी बॅचचे विद्यार्थी पुन्हा एकत्र आले, तेव्हा काळ जणू पुन्हा मागे फिरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला. जुन्या आठवणी, शाळेतील खोड्या, शिक्षकांचे संस्कार आणि बालमैत्रीच्या भावना यामुळे ‘दि हेवन लॉन’ सभागृहात भावनांचा ओलावा दाटून आला.

या स्नेहमेळाव्यात निवृत्त मुख्याध्यापक पी. के. तळले सर बोलताना अक्षरशः भावूक झाले. “आम्ही तुम्हाला शिकवून ५१ वर्षे झाली, तरी तुम्ही आम्हा शिक्षकांना विसरला नाहीत. आज तुम्ही दिलेला मान-सन्मान आमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

 belgaum

ते पुढे म्हणाले, “शिक्षक हा अखंड ज्ञान देणारा झरा असतो. आम्ही शिकवलेले विद्यार्थी आज जीवनात यशस्वी झाल्याचे पाहून आमचा उर अभिमानाने भरून आला आहे. तुम्ही सर्वजण आयुष्यात आणखी प्रगती करा, हीच आमची सदिच्छा.”

कार्यक्रमाला निवृत्त मुख्याध्यापक आर. आय. कोकितकर, पी. एम. टपालवाले, वाय. बी. चौगुले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यानंतर दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बाळू तुपारे यांनी दिवंगतांची नावे वाचून दाखवताच सभागृह काही क्षण स्तब्ध झाले. अनेकांच्या डोळ्यांत जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींनी अश्रू दाटून आले.

एल. डी. चौगुले यांनी प्रास्ताविकातून शाळेतील दिवसांना उजाळा दिला. “त्या काळातली मैत्री, शिक्षकांचा धाक, तास संपल्यावरचा गोंधळ आणि शाळेच्या मैदानावरील क्षण आजही मनात ताजे आहेत,” असे सांगताना उपस्थितांमध्ये हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

यानंतर गंगू करडे, शोभा जाधव, कांचन देसाई, विजया कदम तसेच मनोहर कित्तूर, कृष्णा तुडयेकर, सुरेश राजूकर, रामलिंग देसाई, बाळू तुपारे आदी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनप्रवासाबरोबरच शाळेतील आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी “आज पुन्हा एकदा शाळकरी झाल्यासारखे वाटत आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी मनोहर कदम, शिवाजी खांडेकर, सुरेश राजूकर, गोपाळ डोंनकरी, यल्लाप्पा चौगुले, एल. डी. चौगुले, गंगू करडे, विजया कदम आणि शोभा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यल्लूताई मेणसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शोभा जाधव यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.