belgaum

पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पूर्ववैमनस्यातून आणि पैशांच्या व्यवहाराचा बहाणा करून एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बेळगाव तालुक्यामधील हुंच्यानट्टी गावाच्या बाहेरील निर्जन भागात घडली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल तलवार (वय २२, रा. मजगाव) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या हल्ल्याप्रकरणी मंजुनाथ शितीमणी आणि त्याच्या इतर ७ ते ८ साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मृत राहुल हा आधी एका खाजगी मेडिकल कंपनीमध्ये नोकरी करत होता.

आरोपी मंजुनाथ शितीमणी आणि त्याच्या टोळीने राहुलवर नोकरी सोडून आपल्यासोबत बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील होण्यासाठी सतत दबाव टाकला होता. मात्र, राहुलने त्यांच्या या दबावाला बळी पडण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच कारणावरून त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होता, ज्याची कल्पना राहुलने आपल्या कुटुंबीयांनाही दिली होती.

 belgaum

आरोपी मंजुनाथ हा कॉलेजमधील वादात कमिशनसाठी मध्यस्थी करायचा आणि तो राहुलचा मित्र नव्हता, अशी माहिती राहुलच्या नातेवाईकांनी दिली. पैशांचे व्यवहार पूर्ण करायचे आहेत, असे खोटे सांगून आरोपींनी राहुलला हुंच्यानट्टी गावाजवळ असलेल्या एका निर्जन स्थळी बोलावून घेतले. राहुल तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या मंजुनाथ आणि त्याच्या ७-८ साथीदारांनी राहुलवर तलवारीने आणि चाकूने भीषण हल्ला चढवला.

या जीवघेण्या हल्ल्यात राहुलच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुलला तातडीने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. “पैशांचे निमित्त करून पूर्वनियोजित कट रचूनच राहुलची फसवणुकीने हत्या करण्यात आली आहे,” असा आरोप मृत राहुलच्या नातेवाईकांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, फरार झालेल्या मुख्य आरोपी मंजुनाथ शितीमणी व त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.