belgaum

उत्तर विभागाच्या आयजीपीपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील रुजू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी आज उत्तर विभागाचे नवीन आयजीपी म्हणून अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. आतापर्यंत या पदाची धुरा सांभाळणारे आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी नवनियुक्त आयजीपी संदीप पाटील यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली.

बेळगाव हे मुख्य केंद्र असलेल्या उत्तर विभागाच्या पोलीस दलातील हा सर्वोच्च प्रशासकीय बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आतापर्यंत उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून कार्यरत असलेले चेतन सिंग राठोड यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. आज त्यांनी नवनियुक्त अधिकारी संदीप पाटील यांचे स्वागत करत त्यांच्याकडे अधिकृतपणे पदभार सोपवला. यानंतर राठोड यांना पोलीस विभागाकडून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

नूतन आयजीपी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर संदीप पाटील यांचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी काळात उत्तर विभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नवीन आयजीपी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाकडे पाहिले जात आहे.

 belgaum

नूतन आयजीपी संदीप पाटील हे बेळगावकरांसाठी नवीन नसून, यापूर्वी २०१० ते २०१३ या काळात त्यांनी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून अत्यंत धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या जुन्या अनुभवामुळे आणि कडक शिस्तीमुळे आगामी काळात उत्तर परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पोलीस आयुक्तालय नसतानाही त्यांनी संपूर्ण जिल्ह्यावर आपला कडक वचक ठेवला होता आणि गुन्हेगारी मोडून काढली होती.

त्यांच्या आधीच्या कार्यकाळात त्यांनी सुरू केलेला ‘जनता दर्शन’ हा उपक्रम प्रचंड गाजला होता, ज्याद्वारे गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जागेवर सुटले होते. त्यांची हीच गाजलेली जुनी कारकीर्द आणि कामाचा धडाका लक्षात घेता, ते उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी म्हणून त्यांच्या बेळगावमधील आगमनामुळे गुन्हेगारी विश्वाचे धाबे दणाणले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.