बेळगाव लाईव्ह : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आता कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षाच्या हायकमांडने घातलेल्या अटींवर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय परिस्थितीत मंत्रिपदासोबतच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही आपल्याकडे राहावे अशी सतीश जारकीहोळी यांची इच्छा असून हायकमांडने मात्र एकाच पदाचा नियम लावल्याने पक्षात नवा पेच निर्माण झाला आहे.
बेंगळुरूमध्ये राज्य काँग्रेसमधील नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू असतानाच आता प्रदेशाध्यक्षपदावरून पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी हे प्रदेशाध्यक्षपदासाठी उत्सुक असले तरी हायकमांडने त्यांच्यासमोर ठेवलेल्या अटींमुळे ते नाराज असल्याचे समजते.
सतीश जारकीहोळी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार आहेत मात्र त्यांनी पक्षासमोर एक प्रमुख अट ठेवली आहे. उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी ज्या पद्धतीने मंत्रिपदासोबत पक्षाचे अध्यक्षपदही सांभाळले त्याच धर्तीवर आपल्यालाही दोन्ही पदे सांभाळण्याची परवानगी मिळावी अशी सतीश जारकीहोळी यांची मागणी आहे.
दुसरीकडे काँग्रेस हायकमांडने सतीश जारकीहोळी यांच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. पक्ष संघटनेची धुरा सांभाळण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि पूर्ण वेळ अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळावी अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे. हायकमांडने त्यांच्यासमोर एक व्यक्ती एक पद या नियमाचा हवाला दिला आहे.
हायकमांडच्या या भूमिकेमुळे सतीश जारकीहोळी कमालीचे नाराज झाले आहेत. सरकार स्थापनेच्या वेळी डी के शिवकुमार यांना मंत्रिपदासोबत प्रदेशाध्यक्षपद टिकवून ठेवण्याची सूट देण्यात आली होती मग हाच न्याय आपल्याला का लावला जात नाही असा सवाल सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयांकडून उपस्थित केला जात आहे. पक्षश्रेष्ठींच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल सतीश जारकीहोळी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
सतीश जारकीहोळी हे अहिंदा समूहाचे एक प्रभावशाली नेते असल्याने हायकमांडसाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही. जर सतीश जारकीहोळी यांनी मंत्रिपद सोडण्यास नकार दिला तर काँग्रेसला प्रदेशाध्यक्षपदासाठी इतर नेत्याचा शोध घ्यावा लागेल. राज्यातील मुख्यमंत्री बदल आणि नवीन नेतृत्त्वाच्या निवडीच्या या अत्यंत संवेदनशील काळात सतीश जारकीहोळी यांची ही नाराजी काँग्रेससाठी नवीन अडचण ठरणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




