belgaum

मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचा राजीनामा जाहीर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोणाच्याही दबावाखाली न येता आपण स्वतःहून अत्यंत आनंदाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षश्रेष्ठींनी केलेली राज्यसभेची विनंती नाकारून आपण राज्यातील जनतेसाठीच कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बेंगळुरूमध्ये गुरुवारी दुपारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या अत्यंत भावुक झाले होते. वर्ष २००६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षातील सर्व नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मतदार हेच माझे देव असून कोणत्याही दबावाशिवाय आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे सिद्धरामय्या यांनी जाहीर केले.

आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचे स्मरण करताना सिद्धरामय्या यांनी सांगितले की, एका सामान्य ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेला मी एक व्यक्ती आहे. आयुष्यात कधी आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री होईन असे स्वप्नही पाहिले नव्हते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीमुळेच एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती इथपर्यंत पोहोचू शकली, असे सांगताना ते भावुक झाले. तसेच आपण नेहमीच बसवेश्वर, बुद्ध, गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांनुसार वाटचाल केली असून संविधान हाच माझा धर्म आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले.

 belgaum

आपल्या ४५ वर्षांच्या राजकीय जीवनातील कडू आठवणींना उजाळा देत सिद्धरामय्या यांनी विरोधकांवर तोफ डागली. राजकारणापासून दूर असलेल्या आपल्या पत्नीवर विरोधकांनी राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप करून मानसिक छळ केल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात राजकारणातून संन्यास घ्यावा असे वाटत होते, मात्र आपल्या अंतरात्म्याच्या आवाजावर आपण लढा दिला आणि सर्व आरोपांतून मुक्त झालो, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. राजकीय प्रवासात अंतर्गत आणि बाहेरील घटकांकडून अनेक कारस्थाने झाली, पण आपण मूल्यांशी तडजोड केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या यशाचे श्रेय देताना सिद्धरामय्या यांनी आपले शिक्षक राजप्पा मास्तर, शेतकरी नेते एम डी नंजुंडस्वामी आणि आपल्याला पहिल्यांदा मंत्रीपद देणारे दिवंगत रामकृष्ण हेगडे यांचे आदराने स्मरण केले. यासोबतच आपल्याला दोनदा मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विशेष आभार मानले.

राज्यात १७ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केल्याचे समाधान असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. आपण पैसा किंवा संपत्ती कमावण्यासाठी राजकारणात आलो नाही, तर जनहिताच्या योजना राबवण्यासाठी काम केले. सरकारने लागू केलेल्या पंचहमी योजनांचा जनतेला मोठा लाभ झाला असून सध्या कर्नाटक राज्य देशात दरडोई उत्पन्नात अग्रस्थानी आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले. विरोधकांनी सरकारला दिवाळखोर ठरवण्याचा आणि अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यात यश आले नाही, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या पुढील भूमिकेविषयी स्पष्ट संकेत देताना सिद्धरामय्या यांनी सांगितले की, राजकारण्यांना कधीही निवृत्ती नसते. आगामी काळात आपण कदाचित निवडणूक राजकारणापासून दूर राहू, परंतु सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच सक्रिय राहून जातीयवादी शक्तींविरोधात लढत राहू. संविधानाला धक्का लावणाऱ्यांच्या विरोधात आपला संघर्ष सुरूच राहील, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याचे सांगत सिद्धरामय्या यांनी सर्व आमदार, अधिकारी आणि जनतेचे आभार मानले. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.