बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सीमावासीय मराठा समाजाचे सामाजिक विघटन आणि विविध क्षेत्रांतील शोषण रोखण्यासाठी ‘मराठा एकता एक संघटन’ या सामाजिक संघटनेच्या वतीने ३१ मे रोजी ‘एक दिवस समाजासाठी : संघटित मराठा समाज सोहळा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मराठा मंदिर सभागृहात प्रबोधन मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. रविवारी 31 मे रोजी मराठा मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी यांनी समाजाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. आपल्या हक्कांपासून वंचित राहिलेल्या सीमावासीय मराठा समाजाने आता तरी जागे होऊन संघटित झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया परशुराम नंदिहळ्ळी यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत उपस्थित नारायण झंगरूचे यांनी या उपक्रमाच्या व्यापकतेवर प्रकाश टाकला. बेळगावमधील निष्पक्ष, निस्वार्थ आणि समाज समर्पित मराठा बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटित समाज उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन नारायण झंगरूचे यांनी केले.

समाजाच्या इतर समस्या मांडताना सुदर्शन जाधव प्रभू यांनी तरुणांच्या विवाहविषयक अडचणींवर चिंता व्यक्त केली. आज मराठा समाजातील अनेक तरुणांचे वय चाळीशी पार करूनही लग्ने होत नसून ही अतिशय गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया सुदर्शन जाधव प्रभू यांनी दिली.
संघटनेचे सचिव अमोल जाधव यांनी जमिनीचे वाद आणि प्रशासकीय त्रुटींमुळे समाज अडचणीत आल्याचे स्पष्ट केले. कन्नड कागदोपत्री प्रशासन यंत्रणेमुळे शेती, घर आणि मालमत्तेचे वारसा हक्क किंवा वाटण्या रखडल्याने आपापसात तंटे वाढले असून समाज सुडाच्या भावकीत अडकला आहे, अशा शब्दांत अमोल जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.




