belgaum

नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर रोडवरील टिळकवाडी परिसरातील आश्रय एम्पायर समोरील ‘गोल्डन मोटर्स’ या विद्युत दुचाकी विक्रीच्या दुकानाला शनिवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. मात्र, पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले.

पहाटे सुमारे साडेपाचच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला याची माहिती दिली. तसेच दुकानावरील संपर्क क्रमांकावर फोन करून दुकानमालक गावडे यांनाही घटनेची कल्पना दिली.

माहिती मिळताच दुकानमालक घटनास्थळी धावून आले. दरम्यान, अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा फवारा मारत आग आटोक्यात आणली. स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट हे आगीमागील प्राथमिक कारण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 belgaum

ही आग वेळीच लक्षात आली नसती, तर परिसरातील कापड व इतर दुकानांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ‘गोल्डन मोटर्स’चेही फारसे नुकसान झाले नसल्याचे समजते.

घटनेनंतर शेजारील दुकानदारांनीही आपापली दुकाने उघडून पाहणी केली. आग इतरत्र पसरली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.