belgaum

मनपाची स्वच्छ सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी धडपड

0
110
City corporation bgm
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यंदा बेळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. शहराला देशात सर्वोत्तम मानांकन मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ वेगाने राबवले जात असून, यामध्ये स्थानिक जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली. महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्या थेट देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण अभियान चालवले जात असून, शहराची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्यावर यात भर दिला जात आहे.

२०१६ पासून केंद्र शासनाने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा सुरू केली असून, यामध्ये लोकसहभागाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. उत्कृष्ट काम करणाऱ्या शहरांना ‘स्टार रँकिंग’ आणि मानाचे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. याच पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेनेही यंदा जोरदार तयारी केली असून, आतापर्यंत शहरातील सुमारे १६ हजार जागरूक नागरिकांनी आपला डिजिटल अभिप्राय (रेटिंग) नोंदवून शहराच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले आहे.

 belgaum

मात्र, महापालिकेचे अधिकृत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बेळगावच्या एकूण लोकसंख्ये पैकी किमान ५ टक्के नागरिकांनी या प्रक्रियेत भाग घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

या सर्वेक्षणाचे स्वरूप अत्यंत सोपे आणि डिजिटल ठेवण्यात आले आहे. नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावलीमध्ये प्रामुख्याने कचऱ्याची विल्हेवाट, वर्गीकरण आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता अशा केवळ पाच मूलभूत प्रश्नांचा समावेश आहे.

महापालिकेने यासाठी खास क्यूआर कोड आणि मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली असून, नागरिक घरी बसून किंवा सार्वजनिक ठिकाणी हा कोड स्कॅन करून काही सेकंदांत आपली उत्तरे नोंदवू शकतात. सध्या महापालिकेचे विशेष प्रतिनिधी शहरातील विविध भागात, संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना या प्रक्रियेची माहिती देत आहेत आणि त्यांचे मत जाणून घेत आहेत.

बेळगावला स्वच्छतेच्या क्रमवारीत अव्वल स्थानी नेण्यासाठी नागरिकांनी या प्रतिनिधींना सहकार्य करावे किंवा स्वतःहून ॲपचा वापर करून आपले अमूल्य मत नोंदवावे, असे जाहीर आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.