belgaum

नीलण्णावरच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; उलट-सुलट चर्चांना उधाण

0
481
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह:
४६०० कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाइल कथित आर्थिक घोटाळ्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या बेळगावमध्ये आता एक नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शशिकांत नीलण्णावर यांनी इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ पोस्ट करत, आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही,” असा दावा करताना नीलण्णावर कमालीचे भावुक झाल्याचे या व्हिडिओंमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, एका वृद्ध महिलेसह माजी सैनिकाने जाहीरपणे त्यांची पाठराखण केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी नीलण्णावर यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कामावर विश्वास दर्शवला आहे. नीलण्णावर यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेने त्यांचे समर्थन केले आहे. “ते गरिबांचे कैवारी असून त्यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप लादले जात आहेत,” असे म्हणत या महिलेने नीलण्णावर यांच्या बचावाचा प्रयत्न केला आहे.

तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भारतीय लष्करातील निवृत्त सुभेदार नरेंद्रकुमार यांनी नीलण्णावर यांच्या ‘शिवम् असोसिएट्स’चे आभार मानले आहेत. सेवानिवृत्तीनंतर या संस्थेने आपल्याला सन्मानाने जगण्याची संधी दिली, तसेच अनेकांना रोजगार मिळवून दिला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 belgaum

तपास सुरू असतानाच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून एकीकडे पोलीस प्रशासन या ४६०० कोटींच्या कथित महाघोटाळ्याची सखोल चौकशी करत असतानाच, दुसरीकडे थेट सोशल मीडियावरून संशयित आरोपीच्या समर्थनार्थ व्हिडिओ समोर येत असल्याने बेळगावच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

तपास यंत्रणा या व्हिडिओंच्या पडताळणीकडे कशा प्रकारे पाहतात आणि या नव्या वळणाचा प्रकरणावर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.