belgaum

बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा दिमाखदार सत्कार

0
151
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा बेळगावमध्ये भव्य सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मराठा’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर प्रकाशित करण्यात आलेली ‘मराठा’ (परंपरा, वर्तमान आणि भविष्य) ही पुस्तिका समाजाला योग्य दिशा दर्शवण्यासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण, वास्तवावर आधारित आणि मार्गदर्शक असून, मराठा समाजात या पुस्तकात मांडलेल्या विचारांचे स्वागत होत आहे.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रकाश बेळगोजी यांच्या पत्रकारितेचा गौरव करत ही निवड बेळगावकरांचा सन्मान असल्याचे सांगितले. तसेच मराठा समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आणि समाजाचे हित जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

 belgaum

कार्यक्रमात बोलताना मालोजीराव अष्टेकर यांनी बेळगावच्या मराठा समाजाचा जाज्वल्य इतिहास जतन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. विस्मृतीत गेलेल्या मराठा योद्ध्यांचे कार्य समाजासमोर येणे गरजेचे आहे. प्रकाश बेळगोजी यांनी सीमाप्रश्न आणि येथील मराठी माणसाची परिस्थिती सातत्याने मांडून सहकार्य करावे, असे आवाहन मालोजीराव अष्टेकर यांनी केले.

यानंतर रमाकांत कोंडुसकर यांनी समाजातील सुशिक्षित मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. केवळ विचार मांडून उपयोग नाही तर कृतीची गरज आहे, असे स्पष्ट करत मुलीबाळांच्या संरक्षणासाठी आपण कोणत्याही कायदेशीर लढ्याला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले.

गुणवंत पाटील यांनी प्रकाश बेळगोजी यांच्या गेल्या १५ वर्षांच्या पत्रकारितेचा प्रवास अधोरेखित केला. सामान्य माणसाचा आवाज सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले असून, मिळालेले राज्य उपाध्यक्षपद हा संपूर्ण बेळगावचा गौरव असल्याचे प्रतिपादन गुणवंत पाटील यांनी केले.

समाजाच्या सद्यस्थितीवर बोलताना अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले की, बेळगावमधील मराठा समाजासमोर व्यवसाय, रोजगार, शिक्षण आणि विवाह हे अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी समाजाने एकत्रितपणे चिंतन शिबिर आयोजित करणे काळाची गरज आहे, असे मत अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर यांनी व्यक्त केले.

तरुणांच्या जडणघडणीसाठी समाजात एक आचारसंहिता असणे आवश्यक असल्याचे सांगत शुभम शेळके यांनी यात्रा-जत्रांच्या नावावर होणाऱ्या अवाजवी आणि कर्जबाजारी करणाऱ्या खर्चावर चिंता व्यक्त केली. प्रकाश बेळगोजी यांनी ‘मराठा’ पुस्तिकेच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचा स्तुत्य पुढाकार घेतल्याबद्दल शुभम शेळके यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रणजीत चव्हाण पाटील होते सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक अनंत लाड यांनी केले. यावेळी मध्यवर्ती मराठा समाज सुधारणा मंडळाचे प्रकाश मरगाळे, सकल मराठा समाजाचे किरण जाधव, माजी आमदार अनिल बेनके,शिवाजी सुंठकर, भाजप नेते धनंजय जाधव युवराज जाधव, काँग्रेस नेते नागेश देसाई, रमेश गोरल, रेणू किल्लेकर, शिवाजी हंडे,एस एम बेळवटकर, दिगंबर पवार,आर आय पाटील, शरद पाटील, जयराज हलगेकर धनंजय पाटील,यांच्यासह या सोहळ्याला रायगडवरून आलेले पत्रकार नरेश पाटील, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मराठा समाजाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.