बेळगाव लाईव्ह :आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव मधील अनाधिकृत कत्तलखाने तात्काळ बंद करण्याबरोबरच गो-हत्त्या रोखण्यात यावी अशी मागणी श्रीराम सेना बेळगाव संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
श्रीराम सेना बेळगावतर्फे उत्तर कर्नाटक राज्य अध्यक्ष रवीकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदन सादर केल्यानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना रविकुमार कोकितकर यांनी सांगितले की, मुसलमान बांधवांच्या बकरी ईद या सणा दिवशी म्हणजे 28 मे रोजी कुर्बानी दिली जाते.
त्यावेळी बकऱ्या सोबतच गाईंचीही कुर्बानी दिली जाते. कर्नाटकात गो-हत्त्या बंदीचा कायदा लागू असला तरी दुर्दैवाने त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. गाईंची तस्करी आणि हत्या केली जात असून हे राजरोस सुरू आहे. हे घडता कामा नये. त्यासाठी येत्या बकरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये आवश्यक ठिकाणी नाकाबंदी केली जावी. संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात यावी.
रात्रंदिवस पोलीस गस्त ठेवावी याखेरीस बेळगाव मधील अनधिकृत कसाईखाने बंद केले जावेत अशा मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे केले आहेत. गो-हत्त्या रोखण्यासाठी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते दिवस-रात्र सज्ज आहेत. जर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गो-हत्त्येचा प्रयत्न झाल्यास तो आम्ही हाणून पाडू.
तसे घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आमची विनंती आहे की प्रशासनाने तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी. तसेच आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पोलीस प्रशासन व सरकार जबाबदार राहील, असा इशारा कोकितकर यांनी शेवटी दिला. याप्रसंगी श्रीराम सेना उत्तर कर्नाटक उपाध्यक्ष विनय अंग्रोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





