belgaum

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय

0
242
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठा मंदिर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन सुनावणीसह, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि कन्नड संघटनांच्या वाढत्या कुरघोड्यांविरोधात पुढील आंदोलनात्मक लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेची आणि ठरावांची अधिक माहिती दिली. बैठकीत प्रामुख्याने चार महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा करून पुढील रणनीती आखण्यात आली.येत्या १ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या हुतात्मा दिन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक उकरून काढल्या जाणाऱ्या भाषावादाचा निषेध करण्यात आला. या कुरघोड्यांना चोख उत्तर देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक विशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी येत्या ३० मे पर्यंत सर्व घटक समित्यांची बैठक घेऊन आंदोलनाची अंतिम तारीख निश्चित केली जाईल.

सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र सरकार दाखवत असलेल्या उदासीनतेवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची एकही बैठक झालेली नाही, तसेच मुख्यमंत्र्यांनी सीमावासीयांना भेटीसाठी वेळ न दिल्यामुळे येत्या १५ दिवसांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावेळी भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला. आयोगाच्या ४० अहवालांमध्ये बेळगावमध्ये २० टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक असल्याने सर्व सरकारी परिपत्रके मराठीत देण्याचे नमूद आहे. या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करून महाराष्ट्राच्या आगामी लोकसभा अधिवेशनात संसदेमार्फत सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीस्तव महाराष्ट्र सरकारवर दबाव आणण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

 belgaum

कन्नड संघटनांकडून सुरू असलेल्या कुरघोड्यांना कर्नाटक सरकार खतपाणी घालत असून सीमाभागातील मराठी भाषिकांना डिवचण्याचे काम सुरू आहे. याविरोधात आधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल आणि त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही तर महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या पद्धतीने हे सर्व थांबवेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश मरगाळे यांनी दिली.

महानगरपालिकेत कन्नड संघटनांकडून सीमाप्रश्नाविरोधी ठराव मांडण्याची तयारी सुरू असताना महाराष्ट्र एकीकरण समिती गप्प का, असा सवाल करत समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत आपली आक्रमक मते मांडली.

आंदोलनात्मक लढा हाती घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे मत घेणे अत्यंत गरजेचे असते. सर्व घटक समित्यांच्या बैठका होतील, मात्र कोणतेही आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मत सर्वात महत्त्वाचे असल्याने आधी त्यांच्याशी चर्चा केली जाईल, आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे स्पष्टीकरण माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी दिले.

या बैठकीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खानापूर समितीचे गोपाळराव पाटील, अमर येळ्ळूरकर, लक्ष्मण होनगेकर, बी. डी. मोहनगेकर, आर. सी. मोदगेकर, एम. जी. पाटील, एम. बी. गुरव, लक्ष्मण पाटील आणि अजित पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.