belgaum

नेहरूनगर डी-मार्ट रस्ता बनला ‘माईन्स रोड’ : अवजड वाहनांवर बंदीची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:

बेळगावातील नेहरूनगर येथील डी-मार्ट रस्ता सध्या ‘माईन्स’ रोडसारखा बनला आहे. रस्त्यावरील अवजड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होण्याबरोबरच अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

नेहरूनगर येथील डी-मार्ट चौक परिसरातून दररोज सकाळी 8 वाजल्यापासून दगड, वाळू, विटा आणि माती वाहून नेणारे 50 ते 60 हून अधिक ट्रक, टिप्पर भरधाव धावत असतात. तसेच एपीएमसी मार्केट यार्डकडे जाणारे ट्रकही पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी याच रस्त्याचा वापर करत आहेत.

 belgaum

याशिवाय पहाटे आणि रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या टँकरची वाहतूकही सतत सुरू असते. डी-मार्ट रस्त्यावर हृदयरोग विशेष रुग्णालय तसेच पुढे केएलई रुग्णालय आहे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या रुग्णालयांकडे आपत्कालीन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डी-मार्ट परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मार्गावरून शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, लहान मुले आणि वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात जाणाऱ्या डॉक्टरांनाही वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहोचणे कठीण होत आहे.

दरम्यान, अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याखालील ड्रेनेज पाइपलाइन आणि पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन फुटत असून दुरुस्तीसाठी वारंवार रस्ता खोदण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. तसेच बऱ्याचदा उंच अवजड वाहनांमुळे या रस्त्यावरील घरांच्या सर्व्हिस वायर सुद्धा तुटत आहेत.

तरी या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन सदर रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस तात्काळ बंदी घालून पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.